जलदूत होऊन भागवितो ३०० कुटुंबांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:25+5:302021-06-10T04:20:25+5:30
सौंदड : जिल्ह्यात प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरण आणि कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली आहेत. सडक ...
सौंदड : जिल्ह्यात प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरण आणि कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली आहेत. सडक अर्जुनी तालु्क्यातील सौंदड येथे पाणीटंचाई आहे. या गावाजवळ चूलबंद नदी आहे. मात्र, ती कोरडीठाक पडल्याने गावातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी ३० वर्षीय रोशन शिवणकर हा जलदूत म्हणून धावून आला आहे.
दररोज तो तब्बल तीनशे कुटुंबीयांना टँकरद्वारे तब्बल दीड लाख लीटर पाणी मोफत पुरवितो. पाणीटंचाई गोंदिया जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेली आहे. मागील तीन वर्षांत ही समस्या भीषण रूप धारण करू लागली आहे. लोकांनाच पिण्यासाठी पाणी नसल्याने जनावरांना काय पाजणार, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशीच भीषण परिस्थिती सौंदडची आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी चूलबंद नदीच कोरडीठाक पडल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांपासून तर लहान बालकांमध्येही आणीबाणी दिसून येत आहे. ही बाब रोशन शिवणकर या तरुणाच्या लक्षात आली. तेव्हा त्याने प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेत, गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून टँकरद्वारे पाणी आणून तो नागरिकांची तहान भागवत आहे. दरवर्षीच्या उन्हाळा हा सौंदड गावासाठी सर्वात कठीण काळ असतो. या वर्षी ही पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा अवास्तव वापर या कारणामुळे आहे. सोबतच कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईकडे दुर्लक्ष झाल्याचे अधिकारी सांगतात, परंतु यंदा रोशनसारखा जलयुवक नागरिकांसाठी जलदूत म्हणून धावून आला नसता, तर नक्कीच पाण्यासाठी मोठी आणीबाणी निर्माण झाली असती, हे मात्र खरे. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी सौंदड येथील पाणीटंचाईवर उपाय शोधल्यास रोशन शिवणकरसारख्या जलदूताला नागरिकांवर आलेली पाणीटंचाई दूर करण्यास धावून येण्याची गरज पडणार नाही.