रा.तु.म. विद्यापीठाचे दत्तक गाव होणार स्वच्छ

By admin | Published: January 12, 2016 01:34 AM2016-01-12T01:34:59+5:302016-01-12T01:34:59+5:30

एरवी खासदार-आमदारांचे हाती कुदळ किंवा फावडे केवळ भूमिपूजनाच्या कार्यक्रमात दिसते.

R. T.M. The University's adopted village will be clean | रा.तु.म. विद्यापीठाचे दत्तक गाव होणार स्वच्छ

रा.तु.म. विद्यापीठाचे दत्तक गाव होणार स्वच्छ

Next

खासदारांनीही केले श्रमदान : शिबिरात २७ महाविद्यालयांचा समावेश
अर्जुनी मोरगाव : एरवी खासदार-आमदारांचे हाती कुदळ किंवा फावडे केवळ भूमिपूजनाच्या कार्यक्रमात दिसते. पण गोंदिया-भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे श्रमदान पाहून आपल्याही हातात टोपले घेऊन श्रमदान केले. नेत्यांच्या अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांचा हुरूप वाढला असून रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे हे दत्तक गाव पूर्णपणे स्वच्छ होण्याच्या मार्गावर आहे.
बोंडगावदेवी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापिठस्तरीय शिबिर सुरू आहे. या शिबिराला खा.नाना पटोले यांनी सोमवारी भेट दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे श्रमदान सुरू होते. खासदारांनाही राहावले नाही. त्यांनी चक्क फावडे हातात घेवून तब्बल १५ मिनिटे नालीतील गाळ उपसून ट्रॅक्टरमध्ये घालण्यासाठी विद्यार्थ्यांना हातभार लावला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरअंतर्गत गेल्या तीन दिवसांपासून बोंडगावदेवीत सुरू असलेल्या या शिबिरात २७ महाविद्यालयांच्या १०७ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. नागपूर विद्यापीठाने पाच गावे दत्तक घेतली आहेत. त्यात गोंदिया जिल्ह्यातील बोंडगावदेवी या एकमेव गावाचा समावेश आहे. या शिबिराच्या माध्यमातून गावात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांचे श्रमदान बघून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान साकार होण्याची अनुभूती आल्याचा आशावाद सरपंच राधेशाम झोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
दिल्ली येथील लाल किल्यावरुन देश, राज्य, जिल्हा व गावागावात स्वच्छ भारत अभियान राबविण्याची प्रेरणा पंतप्रधानांनी दिली. त्यांनी स्वत: हातात झाडू घेवून स्वच्छतेचा संदेश दिला. या शिबिरातील विद्यार्थी हे प्रामाणिकपणे श्रमदानातून स्वच्छतेचे कार्य करीत आहेत. यात कुठेही देखावा नाही. स्वच्छतेविषयी लोकांची मानसिकता व आपुलकी अद्याप निर्माण झालेली नाही. गावागावात या रासेयो विद्यार्थ्यांचे अनुकरण केल्यास निश्चितच स्वच्छ भारत या संकल्पनेचे सार्थक होईल, असे मार्गदर्शनही यावेळी खा.नाना पटोले यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

परप्रांतीय विद्यार्थी आकर्षण
या रासेयो शिबिरात माधवराव वानखडे शारीरिक शिक्षण महाविद्यालय कामठी येथील परप्रांतीय विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ते या शिबिराचे आकर्षण आहेत. श्रीनगर येथील खादीम अली, मोहम्मद एहसान, महरिश जान, सुमय्या कौशर, अंदमान येथील बैरो, लाकरे, कारगील येथील मोहम्मद हसन, जम्मू येथील कविता देवी यांचा समावेश आहे.
श्रीनगर परिसरात शारीरिक शिक्षण महाविद्यालयांची कमतरता आहे. काश्मिर विद्यापीठात एमएड्ची सुविधा आहे, मात्र प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा आहे. बोंडगावदेवी येथील लोकांनी दिलेले प्रेम, आपुलकी, यामुळे आम्ही भारावून गेले. येथे अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. याचा आमच्या जीवनात निश्चितच लाभ होईल, असे मत या विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

Web Title: R. T.M. The University's adopted village will be clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.