रब्बी धानाची लागवड नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:31 PM2017-11-17T22:31:05+5:302017-11-17T22:32:55+5:30
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी पाऊस झाल्याने उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पाणी बचतीच्या विविध उपाययोजना प्रशासनाकडून राबविल्या जात आहे. अत्यल्प पावसामुळे गेल्या वीस पंचवीस वर्षांत प्रथमच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात धानपिकांची लागवड करु नका, असे आवाहन शेतकºयांना करण्याची वेळ कृषी विभागावर आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात सरासरी ११५० मि.मी.च्या वर पाऊस पडतो. त्यामुळे शेतकºयांना खरीप हंगाम आटोपल्यानंतर उन्हाळी धानपिकांची लागवड करणे शक्य होते. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि ५३४ मामा तलावांची सुध्दा शेतकऱ्यांना मदत होते. त्यामुळेच शेतकरी खरीपातील धानपिकांची कापणी झाल्यानंतर रब्बीची तयारी करतात. दरवर्षी जवळपास ७० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. मात्र कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यातील २० ते २२ हजार हेक्टरवरच रब्बी पिकांची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
आधीच धानाच्या लागवड क्षेत्रात घट झालेली आहे. त्यातच रब्बी हंगामात सिंचन प्रकल्पातील पाणी पिकांसाठी मिळणार नसल्याने धानपिकांची लागवड करु नका, असे फर्मान कृषी विभागाने काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे खरीपातील धानपिक वाया गेले. त्यामुळे रब्बी हंगामात धान पिकांची लागवड करुन त्यातून ही कसर भरुन काढण्याच्या विचारात शेतकरी होते. मात्र कृषी विभागाने रब्बी हंगामात धानपिक वगळून इतर कमी पाण्याच्या पिकांची लागवड करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे.
मागील पंचवीस वर्षांत प्रथमच अशी स्थिती
जिल्ह्यात कमी यावर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात धानपिकांची लागवड करु नका. असे फर्मान काढण्याची वेळ कृषी विभागात मागील पंचविस वर्षांत प्रथमच आल्याची माहिती आहे. त्याला कृषी विभागाच्या अधिकाºयांनी आणि जिल्ह्यातील जाणकार शेतकऱ्यांनी दुजोरा दिला आहे. यावरुन यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
शहरवासीयांची पाण्याची भिस्त पुजारीटोलावर
गोंदिया शहराला महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेतून पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला. मात्र यंदा कमी पावसामुळे वैनगंगानदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या योजनेतून अत्यल्प प्रमाणात पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. ही समस्या ओळखून सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
सिंचन प्रकल्पात मोजकाच पाणीसाठा
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात १५ नोव्हेंबरपर्यंत २० ते २२ टक्के पाणीसाठा आहे. प्रकल्पातील एकूण पाण्यापैकी काही पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावे लागते. उन्हाळा सुरू होण्यास पुन्हा चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणी उन्हाळी पिकांसाठी सोडले तर जिल्ह्यात पाणी टंचाईची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे संकट ओळखून कृषी विभागाने हे पाऊल उचलल्याचे बोलल्या जात
कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. रब्बीतील धानपिकांना अधिक पाणी लागते. त्यामुळे पाण्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. धानपिक न घेता कमी पाण्याची हरभरा, लाखोळीसारखी पिके शेतकऱ्यांनी घ्यावी.
- अनिल इंगळे,, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.
कीडरोगांमुळे यंदा खरीपातील अर्धे उत्पन्न सुद्धा हाती येण्याची शक्यता नाही. त्यामुळे रब्बीत धानपिकाची लागवड करुन यातील कसर भरुन काढणार होतो. मात्र कृषी विभागाच्या फर्मानाने नवीनच संकट उभे ठाकले आहे.
- रामेश्वर बसोने,सोनपुरी (शेतकरी)