गोदाम रिकामे न झाल्यामुळे रब्बी खरेदी वांद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:42+5:302021-05-03T04:23:42+5:30
सौंदड : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने मागील खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल करण्यात आली ...
सौंदड : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने मागील खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. त्यामुळे गोदाम हाऊस फुल्ल असल्याने रब्बीतील धान खरेदी करायची कशी असा प्रश्न या दोन्ही विभागांसमोर निर्माण झाला आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळद्वारे मागील २० वर्षांपासून हमीभावाने धान खरेदी सुरू आहे. खरीप हंगामातील धानाची उचल डिसेंबर किंवा जानेवारीपासून होत होती. सब एजंट संस्थानी खरेदी केलेला धान हा गोदाममध्येच साठवण करण्याच्या सूचना शासनाच्या आहेत. यावर्षी संस्थांनी खरेदी केलेला धान गोदाममध्येच पडला आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यांतील काही संस्थांनी गोदाम पूर्ण भरल्यानंतर खुल्या जागेत धानाची खरेदी केलेली आहे. मात्र, अद्यापही या धानाची उचल न करण्यात आल्याने रब्बी हंगामातील धान खरेदीवर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील हंगामापर्यंत खरीप धान्याची उचल वेळेवर व्हायची, येणाऱ्या रब्बी हंगामाकरिता गोदाम नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा आता धानाची विक्री करण्याची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे शासन यावर काय तोडगा काढते याकडे लक्ष लागले आहे.