रब्बीचे ३२१ कोटी रुपयांचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:28+5:302021-08-01T04:26:28+5:30

अंकुश गुंडावार गोंदिया : रब्बी हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अद्यापही न मिळाल्याने ...

Rabbi's mistakes of Rs 321 crore are exhausting | रब्बीचे ३२१ कोटी रुपयांचे चुकारे थकले

रब्बीचे ३२१ कोटी रुपयांचे चुकारे थकले

Next

अंकुश गुंडावार

गोंदिया : रब्बी हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अद्यापही न मिळाल्याने जिल्ह्यातील ५० हजारांवर शेतकऱ्यांची आर्थिककोंडी झाली आहे. खरीप हंगामाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना नातेवाइकांकडे उधार उसणवारी आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.

खरीप हंगामाप्रमाणेच जिल्ह्यात रब्बी हंगामातसुद्धा शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामात ११४ धान खरेदी केंद्रावरून २२ लाख ४४ हजार क्विंटल धानाची खरेदी केली. ही रब्बी हंगामातील आतापर्यंतची विक्रमी खरेदी असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील ५६ हजार ३६८ शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दीड महिन्यापूर्वीच धानाची विक्री केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ४१७ काेटी रुपये असून यापैकी आतापर्यंत ९६ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. तर, ३२१ काेटी रुपयांचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना करण्यात आले नाही. चुकारे करण्यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला अद्यापही निधी वर्ग करण्यात आला नाही. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून ५० हजारांवर शेतकरी चुकाऱ्यांसाठी बँका आणि शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवत असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत खरीप हंगामातील धानाची रोवणी सुरू असून त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. मात्र, स्वत:च्या विकलेल्या धानाचे पैसे त्यांना न मिळाल्याने नातेवाईक आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते निधी प्राप्त झाला नसल्याचे सांगून हात वर करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिककोंडी झाली आहे. ............ बोनसचे १५० कोटी रुपये थकले

खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटल धानापर्यंत प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र, यापैकी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना बोनसची ५० टक्के रक्कम देण्यात आली होती. यासाठी जिल्ह्याला १३९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तर, उर्वरित ५० टक्के बोनस देण्यासाठी १५० काेटी रुपयांच्या निधीची गरज आहे. ................ गोदामांची समस्या कायम

खरीप आणि रब्बी हंगामांत एकूण ५५ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी केवळ १५ लाख क्विंटल धानाची आतापर्यंत भरडाईसाठी उचल करण्यात आली आहे. तर, उर्वरित ४० लाख क्विंटल धान अद्यापही गोदामातच पडला आहे. तर, धान साठवून ठेवण्यासाठी बऱ्याच प्रमाणात शाळांचासुद्धा वापर करण्यात आला आहे. गोदामांची समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

Web Title: Rabbi's mistakes of Rs 321 crore are exhausting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.