रबीचे ३०० कोटी रुपयांचे चुकारे थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:55+5:302021-07-16T04:20:55+5:30
मागील खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी लांबली होती. त्यामुळे धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत ...
मागील खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी लांबली होती. त्यामुळे धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी सुरु आहे. यंदा रब्बी हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र शासनाचे धान खरेदीचे नियोजन फसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळेच धान खरेदीला महिनाभराची मुदतवाढ देण्याची वेळ आली. यंदा रब्बीत ३० लाख क्विंटल धान खरेदी करण्याचे नियोजन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केले आहे. आतापर्यंत २० लाख ३३ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. खरेदी करण्यात आलेल्या धानाची एकूण किमत ३७९ कोटी ७६ लाख रुपये असून आतापर्यंत ५०४३४ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. तर ६९ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहे. तर जवळपास ३०० कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत.
..................
२५ लाख क्विंटल धान गोदामातच
मागील खरीप हंगामात ३३ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. मात्र राईस मिलर्स आणि शासन यांच्या तिढा निर्माण झाल्याने धानाची उचल झाली नव्हती. त्यामुळे हा धान गोदामातच पडून असल्याने रब्बी हंगामातील धान खरेदी लांबली होती. मात्र यावर तोडगा निघाल्यानंतर आता धानाची उचल करण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत ८ लाख २६ हजार क्विंटल धानाची उचल करण्यात आली आहे. तर २५ लाख क्विंटल धान गोदामातच पडले आहे.