माेलमजुरी करणाऱ्या हातात रेल्वेचे स्टेअरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:32 AM2021-08-28T04:32:20+5:302021-08-28T04:32:20+5:30

गोंदिया : आपल्याजवळ काही नाही असे समजून निराश होऊन परिस्थितीला हात टेकण्यापेक्षा ओढवलेल्या परिस्थितीशी दोन हात करणे केव्हाही चांगले ...

Railway steering in the hands of laborers | माेलमजुरी करणाऱ्या हातात रेल्वेचे स्टेअरिंग

माेलमजुरी करणाऱ्या हातात रेल्वेचे स्टेअरिंग

Next

गोंदिया : आपल्याजवळ काही नाही असे समजून निराश होऊन परिस्थितीला हात टेकण्यापेक्षा ओढवलेल्या परिस्थितीशी दोन हात करणे केव्हाही चांगले असते. यात अपयश आले तरी चालेल पण प्रयत्न करणे सोडून देता जो परिस्थितीवर मात करण्याचा जो प्रयत्न करतो तो निश्चितच जीवनात यशस्वी होताे. आलेल्या संकटाचा बाऊ न करता आपल्या ध्येयासाठी मोलमजुरी करणाऱ्या युवकाच्या हातात आता रेल्वे स्टेअरिंग आले आहे. त्याच्या प्रवासाने अश्रूंची फुले झाल्याचे चित्र आहे.

बादल बालकदास गजभिये रा.आसोली, ता. गोंदिया असे त्या युवकाचे नाव आहे. २०१३ ला त्याच्यावरील आईचं छत्र हरवलं. अत्यंत विपरीत परिस्थितीत बुद्ध विहारात अभ्यास करून स्पर्धा परीक्षा पास केली. दोन वर्षांपूर्वी लोको पायलटच्या मेरिट लिस्टमध्ये त्याचं नाव आलं आणि आता तो तीन महिन्यांपूर्वी तो नोकरीवर रजू झाला. बादलची कॅन्सरग्रस्त आई तो बारावीला असतानाच मरण पावली. लहानगा विशाल (बादलचा लहान भाऊ) केवळ सातव्या इयत्तेत शिकत होता. आईची कॅन्सरशी झुंज, आपल्या पश्चात आपल्या मुलांचं काय होईल ही आईच्या डोळ्यातली काळजी. औषधाला पैसे नव्हते. सरिता (बादलची बहीण) डी.एड.ला होती. आईला रोज बाराशे रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन लागायचं. यासाठी तिने मोलमजुरी केली. लोकांच्या घरची धुणी भांडी केली. आपल्या दोन भावंडांना जगविण्यासाठी आणि आईच्या औषध पाण्यासाठी आईला कसेही करून वाचवता यावा म्हणून सरिता रोज मजुरी करू लागली. ती त्या दोन्ही भावंडांची आई झाली. स्वतःच्या गरजा मारू मारून पोटाला चिमटा घेऊन भावंडाची ती माय झाली. तिच्या मेहनतीला भावांनी साथ दिली. अशातच २०१३ मध्ये तिची भेट सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर यांच्याशी झाली. त्यांनी जेवढी शक्य होईल तेवढी मदत केली. या कुटुंबांची जवाबदारी स्वीकारत शक्य तेवढी मदत केली. पोरांनीसुध्दा परिस्थितीची जाणीव ठेवत मेहनतीचं चीज केलं. बादलचे वडील बालपणीच मरण पावले. आईच्या छत्रछायेत हे तिन्ही भावंडे जगत होती. पण नियतीला ते पहावले नाही. त्यांची आई कॅन्सरने गेली. दुर्दैवाचे दशावतार कमी होते की काय तिचं घर पडलं. त्या गावच्या शिक्षकांनी या भावंडांना सविता बेदरकर यांच्याकडे पाठविले. या घटनेला आता सात आठ वर्षे लोटली.

..........

पुस्तकेच हेच आपले नातेवाईक

गरिबाला कोणी नातेवाईक नसतात ज्या वेळेस गरज असते आप्तस्वकीय सारेच पाठ फिरवतात. आपली पुस्तके आपला अभ्यास हेच आपले नातेवाईक समजायचे. पोरांनी हे मनात ठेवलं आणि वाटचाल सुरू झाली. लोको पायलट झाल्यानंतर बादलला जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आनंद त्याच्या बहिणीला झाला. तेवढाच आनंद सविता बेदरकर यांना झाला.

..............

अन् बादलने दिला रिझल्ट

बादलचेही आयटीआय झाले होते. मी आता मजुरीवर जाईन असे त्याने बेदरकर यांना सांगितले. यावर त्यांनी मी महिन्याचे एक हजार रुपये तुला पाठवते आणि सरिताच्या लग्नाचा किराणा वाचला आहे तू मला एका वर्षाच्या आत रिझल्ट दे असे सांगितले. ही बाब बादलनेदेखील मनावर घेतली. त्याने भरपूर मेहनत घेतली यानंतर त्याचे एक नाही तीन ठिकाणी सिलेक्शन झाले. अन् तो लोको पायलट म्हणून रुजू झाला.

.....

बुध्दविहारात केला अभ्यास

बादल गावातील बुध्दविहारात रात्रभर अभ्यास करायचा. त्याने आपले ध्येय समोर ठेवून त्यासाठी परिश्रम घेतले. त्याच्या परिश्रमाला फळाला आले असून त्याने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून रेल्वेत लोको पायलट म्हणून अलीकडेच पदभार स्वीकारला आहे. बादलसारख्या प्रचंड मेहनती मुलांचा आदर्श समाजानं खरच डोळ्यासमोर घ्यावा. हे भीमपुत्र बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवून घडत आहेत. इतरांसमोर आदर्श निर्माण करण्याच काम करीत आहेत.

Web Title: Railway steering in the hands of laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.