जिल्ह्यात बरसल्या मृगाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:49+5:302021-06-11T04:20:49+5:30
गोंदिया : हवामान विभागाने ७ जूननंतर मान्सून महाराष्ट्रात सर्वत्र हजेरी लावणार, असा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. ...
गोंदिया : हवामान विभागाने ७ जूननंतर मान्सून महाराष्ट्रात सर्वत्र हजेरी लावणार, असा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. शुक्रवारी (दि. १०) सकाळच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. मृगाच्या सरी बरसल्याने बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
विदर्भात दरवर्षी ७ जूननंतर पावसाला सुरुवात होत असते. त्यामुळे शेतकरी सुध्दा त्यादृष्टीने खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीची कामे सुरू करतात. मृगाचा दमदार पाऊस बरसल्यानंतर पेरणीच्या कामाला सुरुवात करतात. जिल्ह्यात यंदा २ लाख १० हजार हेक्टरवर खरिपाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. शेतकऱ्यांनी मृगाचा दमदार पाऊस बरसल्यानंतर पेरणीच्या कामाला सुरुवात करता यावी, यासाठी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून ठेवली होती. आता थोडा पाऊस पडल्यानंतर धानाचे पऱ्हे टाकण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठीच शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची जुळवाजुळव करून ठेवली आहे. एकंदरीत मृगाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये सुध्दा आनंदाचे वातावरण आहे.