पाच महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:17 PM2019-08-27T22:17:08+5:302019-08-27T22:18:17+5:30
रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता. काही भागात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यात खमारी ६७ मि.मी., परसवाडा ६७, कट्टीपार ७४, आमगाव ६६.२० आणि ठाणा महसूल मंडळात ६७.४० मि.मी.पावसाची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने मंगळवारी (दि.२७) जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची तर जिल्ह्यात सरासरी २६.४८ मि.मी.पावसाची नोंद झाली.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली असून रोवण्यांना सुध्दा संजीवनी मिळाल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.
रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी पहाटेपर्यंत कायम होता. काही भागात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यात खमारी ६७ मि.मी., परसवाडा ६७, कट्टीपार ७४, आमगाव ६६.२० आणि ठाणा महसूल मंडळात ६७.४० मि.मी.पावसाची नोंद झाली.तीन दिवस झालेल्या पावसामुळे गोरेगाव आणि आमगाव तालुक्यात आठ ते दहा घरांची पडझड झाली.त्यामुळे नागरिकांना नुकसान सहन करावे लागले.
पावसाचा जोर कायम असला तरी जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने अद्यापही तूट कायम आहे. यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाल्याने रोवणीची कामे लांबली होती. आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीला रोवणीच्या कामाला वेग आला. रोवणी केल्यानंतर आठ दहा दिवसांच्या कालावधीत पावसाची गरज असते.यामुळे पिकांची चांगली वाढ होते.
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रोवणी केलेल्या धान पिकांना संजीवनी मिळाली.त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. तर सिंचन प्रकल्पात ५० टक्क्यांवर पाणीसाठा असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुध्दा मार्गी लागला आहे.