कोरोना काळात पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 05:00 AM2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:00:02+5:30
जून,जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. धानपिक देखील संकटात आले होते. आॅगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे सावट टळले आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर तलाव बोड्या फुल झाल्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना मागील तीन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार शुक्रवारी दिवसभर कायम होती. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहे. जिल्ह्यात मागील चौवीस तासात २५४६.४० मिमी पावसाची नोंद झाली. तर ३३ पैकी २४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्याने कोरोनात पावसाने कहर केल्याचे चित्र आहे.
जून,जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. धानपिक देखील संकटात आले होते. आॅगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे सावट टळले आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर तलाव बोड्या फुल झाल्या आहे. मागील चौवीस तासात ३३ पैकी २४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने देवरी, आमगाव, सालेकसा तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले आहेत. संततधार पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून पुजारीटोला धरणाचे १२ दरवाजे, कालीसराड धरणाचे ४ आणि संजय सरोवर धरणाचा १ दरवाजा उघडण्यात आला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाबांध जलाशय आणि सालेकसा तालुक्यातील बेवारटोला जलाशय शंभर टक्के भरले असून शुक्रवारी (दि.२८) ते ओव्हरफ्लो झाले. तर इडियाडोह धरण देखील ८५ टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी घरांची आणि झाडांची सुध्दा मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मागील चौवीस तासात झालेल्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे.
रेड अर्लट
हवामान विभागाने पुढील २४ तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने गोंदिया, आमगाव शहरातील वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.
हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली
जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून सिंचन प्रकल्पाच्या पाणी पातळीत सुध्दा वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी नाले सुध्दा दुथडी भरुन वाहत असल्याने नाल्याचे पाणी शेतांमध्ये भरल्याने हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली आली आहे. त्यामुळे केलेली रोवणी वाहून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शेकडो घरांची पडझड
मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने आणि काही भागात अतिवृष्टीची नोंद झाल्याने मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने झाडांची सुध्दा मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. रस्त्यावर झाडे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुध्दा काही वेळ खोळंबली होती.
हे मार्ग झाले बंद
जिल्ह्यात मागील चौवीस तासात सर्वाधिक १४१.५० मिमी पावसाची नोंद देवरी तालुक्यात झाली आहे. संततधार पावसामुुळे आमगाव-देवरी, ओवारीटोला-गोटाबोडी, पांढरवानी-कन्हाळगाव,रोपा-पालांदूर, परसोडी-आलेवाडा, मोहगाव-गडेगाव, शिलापूर-फुक्टीमेटा, अंभोरा-निलज हे मार्ग बंद झाले होते. सालेकसा तालुक्यातील दरेकसा-डहाराटोला व बंजारीकडे जाणारा मार्ग बंद झाला होता.
या महसूल मंडळात अतिवृष्टी
मागील चौवीस तासात जिल्ह्यात २५४६.४० मिमी. पावसाची नोंद झाली सरासरी ७७.१० मिमी पाऊस पडला आहे. ३३ पैकी २४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात गोंदिया तालुक्यातील दासगाव ६८ मिमी, रावणवाडी ७५ मिमी, खमारी ६९ मिमी, कामठा ७० मिमी, गोरेगाव तालुक्यात मोहाडी १०२ मिमी, गोरेगाव ७० मिमी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ७० मिमी, बोंडगावदेवी ७३ मिमी, अर्जुनी मोरगाव ७२ मिमी, महागाव ६६ मिमी, केशोरी ६८ मिमी, देवरी तालुक्यात मुल्ला ७० मिमी, चिचगड ७९ मिमी, देवरी १४१.५० मिमी, आमगाव तालुक्यातील कट्टीपार ९८.४० मिमी, आमगाव ७८ मिमी, तिगाव ९२.८० मिमी, सालेकसा तालुक्यात कावराबांध ८२.२०, सालेकसा ८८.४०, साकरीटोला ९८ मिमी पावसाची नोंद झाली होती.