पावसाचे वाकुल्या दाखविणे सुरूच
By admin | Published: August 4, 2015 01:26 AM2015-08-04T01:26:01+5:302015-08-04T01:26:01+5:30
पावसाळा लागून दोन महिन्याचा काळ लोटला. परंतु तलाव २५ टक्केही भरले नाहीत. पावसाच्या प्रतीक्षेत ६० टक्के
गोंदिया : पावसाळा लागून दोन महिन्याचा काळ लोटला. परंतु तलाव २५ टक्केही भरले नाहीत. पावसाच्या प्रतीक्षेत ६० टक्के शेतकऱ्यांच्या रोवण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. रविवारच्या दुपारपासून काही भागात पावसाने हजेरी लावली. मात्र हा पाऊस बऱ्यापैकी झाला तर अनेक ठिकाणी शिरवाही आला नाही. त्यामुळे पावसाच्या या वाकुल्या दाखविण्याने शेतकऱ्यांचा जीव कासाविस होत आहे.
जून महिना दुष्काळी स्थितीत गेला. यानंतर जुलै महिन्याच्या सुरूवातीला पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी रोपवाटिकेच्या कार्य सुरू केले. परंतु नंतर पावसाने धोका दिला. जवळपास १०-१२ दिवस वातावरण कोरडे राहिले. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने रोपवाटिकेला जीवदान मिळाले होते. परंतु नंतर पुन्हा वातावरण कोरडे झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हेक्टरमध्ये रोपवाटिका व आवत्या घालण्यात आल्या. ग्रामीण भागातील मजूर व महिलांद्वारे धापपीक रोवण्याचे कार्य केले जाते. मात्र पाऊस बरसत नसल्यामुळे लोकांनी घरी बसूून रहावे लागत आहे.
कृषी विभागानुसार, जिल्ह्यात १८ हजार ५८१ हेक्टरमध्ये रोपवाटिका लावण्यात आली आहे. तर ३४ हजार ६५२ हेक्टरमध्ये रोवणी करण्यात आली आहे. तसेच १२ हजार ९३५ हेक्टरमध्ये आवत्या घालण्यात आल्या आहेत. मागील पाच-सहा दिवसांनंतर रविवारी दुपारी अडीच वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले. जोरदार मेघगर्जना झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दमदार पावसाची आशा होती. परंतु २ आॅगस्टच्या रात्री व ३ आॅगस्टच्या सकाळी रिमझिमच पाऊस पडला. तो सुद्धा काही भागातच झाला. आकाश अजूनही ढगाळलेलेच आहे. (प्रतिनिधी)
पीक वाचविण्यासाठी प्रयत्न
जिल्ह्यातील चार प्रमुख जलाशयांपैकी इटियाडोह १५.०३, सिरपूर येथे १६.२१, पूजारीटोला येथे ४०.९३ व कालीसरार येथे १५.३० टक्के पाणीसाठा आहे. इटियाडोहामधून एक हजार क्यूसेक पाणी २६ जुलैपासून सतत सिंचनासाठी सोडले जात आहे. सिरपूर जलाशयाचे पाणी पूजारीटोला जलाशयासाठी चार दिवसपर्यंत सोडण्यात आल्याची माहिती आहे.
आठवडाभर पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीर
जिल्ह्यात आकाशात केवळ ढग पसरलेले दिसत आहेत व रिमझिम पाऊस पडत आहे. चांगल्या दमदार पावसाची शेतकऱ्यांना गरज आहे. आठवडाभरात दमदार पाऊस न आल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाग बियाणे खरेदी करून रोपवाटिका घालणारे व रोवणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर सद्यस्थितीत आर्थिक संकट ओढवण्याचे वातावरण दिसू लागले आहेत.