पावसाळ्याच्या दिवसात ती गावे होतात नॉट रिचेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:30+5:30
शासनाकडून ग्रामीण भागात विकास कामे करण्याचे कितीही दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही समस्या कायम आहे. तालुक्यातील दरेकसा रेल्वेस्टेशनवरुन २० किमी अंतरावर असलेल्या मुरकुटडोह-दंडारी वस्त्यांच्या भागात घनदाट जंगल आणि मोठ्या पर्वतांच्या मधात उंच भागावर वसलेला आहे.
विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील मुरकुटडोह-दंडारीच्या टोकापर्यंत ७५ वर्षांचा कार्यकाळ लोटूनही अद्यापही पक्के रस्ते तयार करण्यात आले नाही. पावसाळ्यात मुरकुडोह १,२,३ आणि टेकाटोला, दंडारी या पाच गावांचा संपर्क रस्त्याअभावी तुटत असल्याने ही गावे तालुक्यापासून नॉट रिचेबल होत असल्याने गावकऱ्यांना पावसाळ्याचे तीन महिने म्हणजे या गावांसाठी काळ्या पाण्याचीच शिक्षा आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने या गावांची दखल घेतली नसल्याने गावकºयांची समस्या कायम आहे.
शासनाकडून ग्रामीण भागात विकास कामे करण्याचे कितीही दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही समस्या कायम आहे. तालुक्यातील दरेकसा रेल्वेस्टेशनवरुन २० किमी अंतरावर असलेल्या मुरकुटडोह-दंडारी वस्त्यांच्या भागात घनदाट जंगल आणि मोठ्या पर्वतांच्या मधात उंच भागावर वसलेला आहे. या वस्त्यांच्या समुहामध्ये मुरकुटडोह १,२,३ तसेच टेकाटोला आणि दंडारी या गावांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गावापर्यंत पोहोचणे म्हणजे कठीण काम आहे. मुख्य कारण म्हणजे या गावापर्यंत जाण्यासाठी अद्यापही पक्का रस्ता नाही. येणारा वर्ष हे देशाचे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. परंतु यानंतरही देशातील अनेक गावे मुख्य मार्गाशी जुळले नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्यात मुरकुटडोह-दंडारीसारख्या गावांचा समावेश आहे. प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी या भागातील मुलभूत सोयींच्या अभावाबद्दल व ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले. मात्र प्रशासनाने याची अद्यापही त्याची दखल घेतली नाही. काही वर्षापूर्वी मुरकुडोह दंडारीचा प्रवास करण्यासाठी दरेकसा, डहाराटोला, बेवारटोला, नवाटोला येथील डोंगराळ मोठे घाट असलेल्या मार्गाने जावे लागत होते. मात्र पावसाळा सुरु होताच सहा महिन्यासाठी त्या गावांचा संपर्क तुटून जायचा आणि त्या गावातील लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परंतु नंतर या मार्गावर बेवरटोला धरण तयार करण्यात आले. मोठ्या धोक्याचे घाट व वळण असल्याने या मार्गाचा उपयोग बंद झाला. त्या गावांना मुख्य मार्गाशी जोडण्यासाठी नंतर शासनाने नवीन ठिकाणातून रस्ता निर्माण करण्याचा निर्णय घेतला. धनेगाव-दलदलकुही, टेकाटोला असा नवीन मार्ग शोधण्यात आला. काही प्रमाणात आधीपेक्षा सोपा असला तरी या गावापर्यंत जाण्यासाठी दलदलकुहीनंतर घनदाट जंगलाची वाट मधात अनेक पर्वत घाट आणि त्यातच एक मोठे लाल पहाडाचे घाट चढावे लागते.उन्हाळयाच्या दिवसात कसे बसे या मार्गावरुन वाहनाची ये-जा होऊ शकते.परंतु पावसाळ्यात या मार्गावरुन ये-जा करणे मुळीच शक्य नाही.पावसाळ्यात पहाडावरील पाणी रस्त्यावरुन वाहन असताना रस्ते दलदल झालेले असतात.अशात या रस्त्यावरुन पायी चालणे ही जीव घेणाप्रवास ठरु शकतो. अशात पक्के डांबरी रस्ते आणि सोबतच पाण्याच्या निचरा होण्याची व्यवस्था व नाली बांधकाम करणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही याकडे प्रशासनाचे लक्ष गेले नसल्याने या पाच गावांची समस्या कायम आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेचे वाजले बारा
दरेकसावरुन दलदल कुही मार्ग १५ किमीचा प्रवास पूर्ण केल्यानंतर समूहातील पहिला गाव टेकाटोला पोहचता येते टेकाटोलावरुन पुढे जात असताना काही अंतरावर उजव्या बाजूला दंडारी गाव पुढे गेल्यास मुरकुडोह ३, मुरकुडोह २ आणि शेवटी अंतीम टोकावर मुरकुडोह-१ वसलेला आहे.तत्कालीन सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या गावांना परस्परांशी जोडण्यासाठी रस्ते मंजूर करण्यात आले. परंतु रस्ते निर्मितीच्या नावावर केवळ सावरासावर करण्यात आली. पावसाळ्यात या गावांना परस्पर एकमेकांशी संपर्क राहत नाही. वर्षानुवर्षे एका बेटावर असलेले हे गाव इतर गावांशी किंवा मुख्यालयाशी वर्षभर जोडण्याचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार असा सवाल गावकरी करीत आहेत.