पावसाची जिल्ह्यात एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:35 AM2021-09-08T04:35:10+5:302021-09-08T04:35:10+5:30
गोंदिया : ‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ अशी मोठ्यांची जुनी म्हण असून पोळा होताच पाऊस कमी होत जातो असे ...
गोंदिया : ‘पोळा आणि पाऊस झाला भोळा’ अशी मोठ्यांची जुनी म्हण असून पोळा होताच पाऊस कमी होत जातो असे म्हटले जाते. मात्र मंगळवारचा (दि.७) पाऊस या म्हणीला अपवाद ठरला असून अवघ्या पावसाळ्यात बरसला नसेल तसा पाऊस आता बरसल्याचे दिसले. यामुळे आता जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झाली असे वाटत असून हा पाऊस पिकांसाठी फायद्याचा ठरत असतानाच उकाड्यापासून सुटका देणारा ठरला.
यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. धान पिकाला आता पावसाची गरज असताना पाऊस न बरसल्याने पीक करपण्याची शक्यता बळावली आहे. पाऊस नसल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नदी-नाले व प्रकल्प अद्याप रितेच आहेत. अशात पोळा साजरा केला जात असतानाच सोमवारी (दि.६) रात्री रिमझिम हजेरी लावल्यानंतर मंगळवारी (दि.७) पहाटे चांगलाच पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा का असेना मात्र दिलासा मिळाला आहे. शिवाय पावसाअभावी वाढलेल्या उकाड्यापासून सर्वसामान्यांची सुटका झाली.