पावसाच्या परतीने जिल्हा सुखावला
By admin | Published: July 12, 2017 02:26 AM2017-07-12T02:26:23+5:302017-07-12T02:26:23+5:30
मध्यंतरी दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा आपली हजेरी लावली असून मागील तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने जिल्हा सुखावला आहे.
तीन दिवसांपासून हजेरी : शेतीच्या कामांना जोमात सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मध्यंतरी दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा आपली हजेरी लावली असून मागील तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने जिल्हा सुखावला आहे. या पावसामुळे अडून पडलेली शेतीची कामे पुन्हा जोमात सुरू झाली आहेत. आतापर्यंत १६९.२ एवढी पावसाची सरासरी नोंद करण्यात आली आहे.
हवामान खात्याने यंदा सुरूवातीपासूनच चांगला पाऊस पडणार असा अंदाज वर्तवून सर्वांना खूश केले होते. मात्र खात्याचा अंदाज आतापर्यंंत तरी चूक ठरला. जुलै महिना अर्ध्यात आला असून आतापर्यंत पावसाळा खऱ्या अर्थाने सुरूच झाला नसल्याचे दिसून येत आहे. एक-दोन दिवस बरसल्यानंतर पाऊस निघून जात असल्याचेच आता पर्यंत दिसले व अशातच जुलै महिना अर्ध्यात आला. पाऊस नसल्याने शेतीची कामेही बंद पडलेली होती.
मागील तीन दिवसांपासून दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने आता कोठे पावसाळा सुर झाल्या सारखे वाटत आहे. तर या पावसामुळे शेतकरीही खूश झाला असून शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. पाऊस नसल्यामुळे रोवणीची कामे अडकून पडली होती. तर ज्यांनी नर्सरी टाकली होती त्यांची नर्सरी करपण्याचा मार्गावर आली होती. मात्र या पावसामुळे आता तो धोका टळला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५५८१.८ मीमी. पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याची १६९.२ एवढी सरासरी आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी १ जून ते ११ जुलै या काळात ११५०४.२ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली होती व त्याची सरासरी ३४८.६ एवढी होती. यंदा मात्र मगील वर्षीच्या तुलनेत या वर्षी अर्धाच पाऊस पडला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.