शहिदांचे स्मारक उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:11 AM2018-07-29T00:11:08+5:302018-07-29T00:11:45+5:30
नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २३ पोलीस अधिकारी-कर्मचारी व ३४ नागरिक शहीद झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २३ पोलीस अधिकारी-कर्मचारी व ३४ नागरिक शहीद झाले आहेत. नक्षल हल्ल्यात आपला प्राण गमाविणाऱ्या पोलिसांसह नागरिकही शहीद असून या सर्व शहिदांचे पोलीस विभाग वर्षभरात स्मारक उभारेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले.
पोलीस विभागाच्यावतीने २० ते २७ जुलै दरम्यान आयोजीत नक्षल दमन विरोधी सप्ताहाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्राचार्य संगिता घोष, पोलीस उपअधिक्षक (गृह) सोनाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले व राजीव नवले उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पाटील भुजबळ यांनी, नक्षलवाद्यांची ही योजना पोलीस विभागाने मोडून काढली पाहिजे. त्यासाठी नक्षल सप्ताहाच्या अगोदरच पोलीस विभागाने नक्षल दमन विरोधी सप्ताह साजरा केला पाहिजे. विकास आणि नक्षलवाद या दोन परस्पर विरोधी भूमिका आहेत. ही बाब जनमानसात पटवून देण्याची गरज असल्याचे सांगीतले. आज पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांची मने जिंकली अशा शब्दात प्राचार्य घोष यांनी पोलीस विभागाचे कौतुक केले. संचालन पोलीस उपनिरीक्षक राधिका कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाला गावकरी उपस्थित होते.
स्पर्धेत यांनी मारली बाजी
पथनाट्य स्पर्धेत येथील प्रपोगंडा सेलने प्रथम, ऐओपी धाबेपवनीने द्वितीय, पोलीस स्टेशन केशोरी व गोठणगावने तृतीय, एओपी बिजेपार व दरेकसाने चतुर्थ तर पोलीस स्टेशन डुग्गीपार यांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे घोषवाक्य स्पर्धेत प्रपोगंडा सेलने प्रथम, जेटीएसईने द्वितीय, पिपरीया व बिजेपारने तृतीय, चिचगड व मगरडोहने चतुर्थ क्र मांक पटकविला. कविता सादरीकरणामध्ये पोलीस स्टेशन केशोरी प्रथम, बिजेपार द्वितीय व नवेगावबांध तृतीय क्र मांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांचे पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी कौतुक केले.
विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन
सप्ताहाच्या निमित्ताने नक्षलविरोधी घोषवाक्य, पोस्टर, व्हिडीओ, पथनाट्य व कविता वाचन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत ८८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. ‘नक्षलवाद आदिवासी जनतेवरील क्रूर अत्याचार’ या विषयावर निबंध स्पर्धा तर ‘नक्षलवाद लोकशाही व विकासाचा शत्रू’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. सप्ताहादरम्यान विद्यार्थी व नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले व त्याचा लाभ एक हजार ३४८ नागरिकांनी घेतला. तर निबंध स्पर्धेत दोन हजार १६३ व वक्तृत्व स्पर्धेत ४२७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या वेळी पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नक्षल या विषयावर उत्कृष्ट पथनाट्य सादर केले.