पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:45+5:302021-06-09T04:36:45+5:30
सडक अर्जुनी : पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्यावतीने ...
सडक अर्जुनी : पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्यावतीने खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे करण्यात आली. यासंदर्भातील निवेदनसुध्दा त्यांना रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता देण्यात आले.
यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार उपस्थित होते. पोलीस पाटील हे पद मानधन तत्त्वावर मानसेवी पद म्हणून कार्यरत आहे. आपातकालीन व नैसर्गिक परिस्थितीत शासनास सहकार्य करीत असते. पोलीस पाटील हे पद मानधन तत्त्वावरील असल्यामुळे अंगणवाडी सेविकाप्रमाणे त्यांना वयाची अट लागू होत नाही. सध्या कोरोना संक्रमणाची परिस्थिती पाहता पोलीस पाटील पदाला मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ करण्यात यावे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व पोलीस पाटलांच्या वारसानांची नियुक्ती त्यांच्या रिक्त जागी करण्यात यावी व सर्व सेवानिवृत्त पोलीस पाटलांना सेवानिवृत्तीची योजना लागू करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली. यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खा. प्रफुल्ल पटेल यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, जिल्हा अध्यक्ष दिलीप मेश्राम, श्रीराम झिंगरे, नंदा ठाकरे, उमेश वाढई, बोरकर पाटील यांचा समावेश होता.
......
४० टक्के पोलीस पाटलांची पदे रिक्त
वर्ष २०२० पासून कोरोना संकटाचा सामना करीत असताना मदत कार्यामुळे आजपर्यंत ४३ पोलीस पाटील मृत्युमुखी पडले आहेत. मागील ४ वर्षांपासून नवीन पोलीस पाटील पदे भरण्यात आलेली नाहीत व अजून दोन वर्षे रिक्त जागा भरण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्यात ४० टक्के पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका पोलीस पाटलाला अनेक गावांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे.