योग्य मोबदला दिल्यावरच टॉवर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:13 PM2018-10-28T22:13:00+5:302018-10-28T22:14:27+5:30
तालुक्यातील ग्राम चिचगाव व पुरगाव येथील शेतकऱ्यांची शेतजमीन रेल्वे प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी रेल्वे टॉवर तयार करण्याकरिता ताब्यात घेतली. मात्र जमिनीचा योग्य मोबदला न देता रेल्वेचे अधिकारी पोलिसांना घेऊन शुक्रवारी (दि.२६) टॉवर उभारण्यासाठी आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील ग्राम चिचगाव व पुरगाव येथील शेतकऱ्यांची शेतजमीन रेल्वे प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी रेल्वे टॉवर तयार करण्याकरिता ताब्यात घेतली. मात्र जमिनीचा योग्य मोबदला न देता रेल्वेचे अधिकारी पोलिसांना घेऊन शुक्रवारी (दि.२६) टॉवर उभारण्यासाठी आले. यावर मात्र शेतकऱ्यांनी जमिनीचा योग्य मोबदला द्या तेव्हाच टॉवर उभार देऊ असा पवित्रा घेतल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागले.
रेल्वे विभागाने तीन वर्षांपूर्वी ग्राम चिचगाव व पुरगाव येथील शेतकऱ्यांची जमीन टॉवर उभारण्यासाठी ताब्यात घेतली होती. मात्र रेल्वेकडून फक्त ३५ हजार रु पयांचे धनादेश शेतकऱ्यांना देत योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ केली. तसेच शुक्रवारी (दि.२६) चिचगाव येथे टॉवर उभारण्यासाठी पोलीस ताफ्यासह दाखल झाले.
शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आपल्या मागण्या रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच जोपर्यंत जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत टॉवरचे काम करू देणार नाही अशी भूमिका घेत टॉवर बांधकामाचे काम थांबविले.
तसेच ७ दिवसांत योग्य मोबदला द्या तेव्हाच टॉवरचे बांधकाम करू देऊ असा इशारा चिचगावचे शेतकरी राजू रहांगडाले, गजेंद्र रहांगडाले, भिकाजी ठाकरे, पूरगावचे शेतकरी प्रल्हाद हरिणखेडे, दिगेंद्र रहांगडाले यांना दिला. यावेळी डी. एम. चाचेरे, सिंग, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, जितेंद्र कटरे, संजय टेंभरे यांच्यासह मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.