"प्रशासनाचा वचक नसल्याने बदलापूर, कोलकातासारख्या घटना"; लाजिरवाणी बाब म्हणत राज ठाकरेंची टीका

By अंकुश गुंडावार | Published: August 21, 2024 06:02 PM2024-08-21T18:02:10+5:302024-08-21T18:02:17+5:30

गोंदिया येथे मनसेच्या मेळावा दरम्यान राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Raj Thackeray criticizes state administration during MNS meeting in Gondia | "प्रशासनाचा वचक नसल्याने बदलापूर, कोलकातासारख्या घटना"; लाजिरवाणी बाब म्हणत राज ठाकरेंची टीका

"प्रशासनाचा वचक नसल्याने बदलापूर, कोलकातासारख्या घटना"; लाजिरवाणी बाब म्हणत राज ठाकरेंची टीका

गोंदिया : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासनव्यवस्था सध्या राहिलेली नाही. मुळात प्रशासनाचा वचक गुन्हेगारावर राहिलेला नाही. त्यामुळेच पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि महाराष्ट्रातील बदलापूर, अकोलासारख्या घटना घडतात. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे ही येथील प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोंदिया येथे केली.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे बुधवारी (दि.२१) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी गोंदिया येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अमित ठाकरे, गोंदिया जिल्हा संघटक रितेश गर्ग, गोंदिया जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, मन्नू लिल्हारे, तालुका अध्यक्ष मुकेश मिश्रा उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, प्रशासनाच्या अशा गळचेपी भूमिकेमुळेच येथील पोलिसांनाही आपले काम मनमोकळेपणाने करण्याची सूट राहिलेली नाही. त्यांनी पोलिसांवर इतका दबाव निर्माण केला आहे की पोलिसांनाही वाटतं की काही कमी जास्त झालं की बळी आपलाच जाणार, प्रशासन आपले हात वर करणार, यामुळेच पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. एकदा माझ्या हातात सत्ता द्या, मग दाखवितो की कसे शासन-प्रशासन चालविले जाते. अशा निगरगट्ट प्रशासनामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. पण, येथील शासनाला याचं काहीही सोयरसुतक राहिलेले नसल्याचा आरोप केला.

...तरच चारही विधानसभा लढविणार

कुणी संधी देणार नाही, संधी हेरून घ्यावी लागणार आहे. याकरिता पक्षाचा संघटनात्मक गाभा म्हणजेच की शेवटच्या माणसापर्यंत स्थानिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पोहोचणे गरजेचे आहे. ते गेल्या १९ वर्षांत या जिल्ह्यात झाल्याचे मला दिसून येत नाही. पुढील दोन महिन्यांत येथील जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष इथपर्यंत तुमची यंत्रणा पोहोचलेली आढळली तरच मी गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा लढवणार नाही. इतर पक्षांकडून सेटिंग करून पैसे कमवायला मी निवडणुकीची तिकिटे देणार नाही असे सांगत पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

राज ठाकरेंसाठी बदलला विदर्भाचा फलाट क्रमांक

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे बुधवारी (दि.२१) विदर्भ एक्स्प्रेसने गोंदिया येथे आगमन झाले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्यासाठी विदर्भ एक्स्प्रेसचा फलाट क्रमांक रेल्वे विभागाने बदलला होता. ही गाडी नेहमी फलाट क्रमांक ५ वर लागते. मात्र बुधवारी ती फलाट क्रमांक १ वर उभी करण्यात आली. राज ठाकरे यांना पाठीत दुखणे असल्याने रेल्वे गाडीत चढताना आणि उतरताना त्रास होऊ नये यासाठी फलाट क्रमांक बदलण्याची विनंती करणारे पत्र रेल्वे विभागाला मनसे पदाधिकाऱ्यांनी दिले होते, अशी माहिती आहे.
 

Web Title: Raj Thackeray criticizes state administration during MNS meeting in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.