राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकुमार बडोलेंना उमेदवारी; मविआकडून उमेदवार कोण असणार? लागले सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 04:26 PM2024-10-24T16:26:07+5:302024-10-24T16:27:28+5:30
Gondia : नवीन समीकरण कितपत प्रभावी ठरणार? लागले लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महायुतीचे गोंदिया जिल्ह्यातील चारही उमेदवार ठरले; मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अद्यापही घोषणा झाली नसल्याने लढतीचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत राजकुमार बडोले यांच्या नावाचा समावेश आहे. महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काही जागांवर उमेदवारांची अदलाबदली करण्याचा प्रयोग राबविला. हा प्रयोग अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कितपत प्रभावी ठरतो हेदेखील महत्त्वपूर्ण आहे.
लोकसभा निवडणुकीत अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला २८ हजार मतांचा खड्डा पडला होता. हा खड्डा महायुतीतील मित्रपक्षाच्या मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान न केल्याने व महायुतीविरोधी लाट असल्याने पडल्याचे बोलले जात होते. यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपसुद्धा झाले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे तिकीट कापून राजकुमार बडोले यांना उमेदवारी जाहीर केली. बडोले यांचे आता चिन्ह बदलले आहे. त्यामुळे लोकसभेतील हिशेब विधानसभेत पूर्ण करण्याच्या तयारीत काही जण आहेत.
महायुतीने वरिष्ठ पातळीवर चांगली मोट बांधली आहे; पण अशीच मोट बडोले यांच्या ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रवेशानंतर बांधली जाणार का? बडोले यांचे भाजपमधील मताधिक्य कायम राहणार का? महायुतीतील तिन्ही पक्षांत योग्य समन्वय साधण्यासाठी हनुमानाची भूमिका कोण पार पाडणार यावरच बरीच समीकरणे अवलंबून आहेत.
महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?
गोंदिया, अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील तिढा अद्यापही सुटलेला नाही. पण, उमेदवारी निश्चित समजून दोन्ही मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, हे अद्यापही जाहीर झालेले नाही.
दोन मतदारसंघात बंडखोरी निश्चिंत
महाविकास आघाडीत अर्जुनी मोरगाव आणि गोंदिया या दोन मतदारसंघांत बंडखोरी होणे निश्चित आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघात उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच बाहेरचे पार्सल चालणार, असा सूर आळवला जात आहे. तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेने टोकाची भूमिका घेत अंतर्गत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येथे बंडखोरी निश्चित आहे.