‘सरकार जागे व्हा’च्या घोषणांनी निघाला मोर्चा
By admin | Published: March 2, 2016 02:17 AM2016-03-02T02:17:11+5:302016-03-02T02:17:11+5:30
संघर्ष वाहिनी व भटके विमुक्त संघर्ष परिषद नागपूर या सामाजिक संघटनेच्या आवाहनानुसार ‘सरकार जागे व्हा व न्याय द्या’ अशा घोषणा ...
न्यायाची मागणी : संघर्ष वाहिनी व भटके विमुक्त संघर्ष परिषदेचे आंदोलन
गोंदिया : संघर्ष वाहिनी व भटके विमुक्त संघर्ष परिषद नागपूर या सामाजिक संघटनेच्या आवाहनानुसार ‘सरकार जागे व्हा व न्याय द्या’ अशा घोषणा करीत सोमवार (दि.२९) दुपारी १२.३० वाजता विमुक्त भटक्या जमातीचा धडक मोर्चा निघाला. सदर मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघर्ष वाहिणीचे राजेंद्र बढिये, माणिक गेडाम, अनिल मेश्राम, परेश दुरूगवार, दिलीप कोसरे आदींनी माल्यार्पण केले. यानंतर असंख्य महिला व पुरूषांचा हा मोर्चा जयस्तंभ मार्गे नेहरु चौकात आला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. येथे संघटक राजेंद्र बढिये, परेश दुरूगवार, अनिल मेश्राम व गजेंद्र वारनकर यांनी मोर्च्याला मार्गदर्शन केले. संचालन दिलीप कोसरे यांनी केले.
येथील सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावे मुख्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आले. या वेळी संघर्ष वाहिणीचे राजेंद्र बढिये, परेश दुरुगवार, जयचंद नगरे, अनिल मेश्राम, दिलीप कोसरे, जानराव घटारे, मोहनलाल कागदीउके, मनिराम मौजे, रवी भोरे, शिशुकला हातांगळे आणि माणिक गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. निवेदनानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विमुक्त भटक्यांना ११ टक्के आरक्षण, क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करणे, राज्याच्या अर्थसंकल्पात विमुक्त भटक्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विशेष आर्थिक तरतूद करणे, व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर वसतीगृह तयार करणे, बेघरांसाठी घरकूल योजना, बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन अल्पदराने कर्ज योजना लागू करणे, जननी सुरक्षा योजनेंतर्गत विमुक्त भटक्या जमातीच्या गरोदर महिलांनासुध्दा प्रसूती पश्चात निधी मिळावा, मच्छिमारांना किमान २०० दिवस हाताला काम व विकास योजना लागू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. सदर मागण्या त्वरित पूर्ण करण्याच्या उद्देशाने शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले.
सदर मोर्चासाठी पुरूषांसह महिला शशीकला हातांगळे, रागिणी मेश्राम, मीना कोसरे, रंजना सुरजकर, आशा सोनवाने, मंदा सुरणकर, सुजाता कोसरे, प्रियंका कोसरे, शीला साऊसकार, प्रियंका कोसरे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)