तंत्रशुद्ध प्रयोगशील शेती करणारी रणरागिणी ‘गायत्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:00+5:302021-03-08T04:28:00+5:30
अमरचंद ठवरे : बोंडगावदेवी : समाजभान जपणारी एक सुसंस्कारीत कर्तृत्ववान महिला संसारिक जीवनात लाभली तर अख्ख्या घराला देवपण येवून ...
अमरचंद ठवरे :
बोंडगावदेवी : समाजभान जपणारी एक सुसंस्कारीत कर्तृत्ववान महिला संसारिक जीवनात लाभली तर अख्ख्या घराला देवपण येवून प्रगतीचे यशोशिखर सहज गाठता येते असे बोलल्या जाते. याचाच प्रत्यय अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कुंभीटोला येथील देवेंद्रबापू राऊत या आदिवासी कुटुंबातील कर्तुत्ववान गायत्री राऊत या ३४ वर्षीय आदिवासी महिलेनी साक्षात आणून दिला.
गायत्रीच्या गुणाला कसब देवून तिच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे काम पती देवेंद्रबापू राऊत नेहमी तिला प्रोत्साहित केले. अल्पशा शेतीमधून कोणत्याही रासायनिक खताचा तसेच औषधीचा वापर न करता भाताचे, रानभाज्याचे उत्पादन घेऊन घरुनच विक्री करतो. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून गायत्री राऊत हिने मोहफुलापासून लाडू, ढोकला, बालूशाई, गुलाब जामुन, मोहफुलाची राब, तेल, लोऱ्या, शिरा यासारखे विविध पोष्टीक व चवीष्ट पदार्थ बनवून सामान्य जनतेला उपलब्ध करुन देण्याचे काम २०१४ पासून स्वत:च्या घरीच सुरु केले. प्रयोगशिल प्रयोग करुन शेती करणारी रणरागिणी गायत्रीने देशाच्या राजधानीसह राज्याच्या विविध ठिकाणच्या कृषी प्रदर्शनीत स्वत: उत्पादित केलेल्या व तयार केलेल्या वस्तुंचे स्टॉल लावून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. गायत्रीला लहानापणापासून शेतीमध्ये आवड होती. गडचिरोली जिल्ह्यातील चांदागड हे तिचे माहेर. गायत्रीचे वडील मोतीराम प्रधान यांच्याकडे १२ एकर शेती होती. तिचे १० वी पर्यंत शिक्षण झाले. माहेरीच शेतीचे तंत्रज्ञान अवगत केले. कुंभीटोला येथील मोरेश्वर बापू राऊत या जमीदाराची सून म्हणून ती आली. शिक्षित असलेला पती देवेंद्रबापू राऊत यांनी पत्नीच्या गुणांची पारख करुन गायत्रीला मनाजोगे प्रयोग करुन शेती करण्यास साथ दिली. २०१२-१३ पासून गायत्रीने सेंद्रिय पद्धतीने जैविक शेती करायला सुरुवात केली.
.......
जुन्या वाणांचे केले संवर्धन
पारंपारिक जुन्या धानाचे वाण,रोप लावले. त्या वाणाची निर्मिती व संगोपन करण्याच्या कामाला प्राथमिकता दिली. वडीलोपार्जित कोणतीही सिंचनाची सोय नसलेल्या शेतीमध्ये जुन्या वाणाची लागवड केली. दुबराज, हिरानक्की, पिटरीस, बासबिर्रा, पिवळी लुचई, काळीकमो, जांभळा भात, खुशी, चिन्नोर या वानाची स्वत: निर्मीती करुन संवर्धन करण्याचे काम ती स्वत: करते. जुन्या वाणाच्या धानाचे उत्पादन घेताना केवळ शेणखताचा वापर करते.
.......
कीटकनाशक नव्हे निंबोळी अर्क वापरा
पिकांवरील कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी जिवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आदीचा वापर केला. धानाचे उत्पादन भरपूर होत नसले तरी विषमुक्त होणारे कमी उत्पादन आरोग्यासाठी पोष्टीक व चवीदार असल्याचे गायत्रीने सांगितले. विषमुक्त तांदळाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने घरबसल्या चांगल्या भावात विक्री होते.
.......
रानभाज्यांची तयार केली परसबाग
घरासमोरील खुल्या जागेत रानभाज्यांची परसबाग तयार करुन त्यात कंदवर्गीय भाज्या, सुरुंग, आलू, बसकंद, मटनारु, मोमनारु, केवकांदा, रताळा, बटाटा, फुलवर्गीय भाज्यांमध्ये सांभार, लसून, कांदे, अद्रक, हळद, तीळ, रानभाज्या, कोलारी भाजी, अरयतकरी, गावरान, कारले, तोंडुळे, पिकांची लागवड करुन जैवविविधता टिकविण्याचे मोलाचे कार्य गायत्री करीत आहे.
.....