गोंदियात इच्छुकांसाठी रान मोकळे
By Admin | Published: October 7, 2016 01:47 AM2016-10-07T01:47:36+5:302016-10-07T01:47:36+5:30
नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण ‘सर्वसाधारण’, अर्थात खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक
नगर परिषद अध्यक्षपद : खुल्या प्रवर्गामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित
गोंदिया : नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण ‘सर्वसाधारण’, अर्थात खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छूक असणाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून ‘देवी पावली’ असा भास त्यांना होत आहे. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवाराला निवडणूक लढविता येणार असल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. यामुळे राजकीय पक्षांपुढील पेचही वाढण्याची शक्यता आहे.
अनेक वेळा विशिष्ट प्रवर्गासाठी पद आरक्षित झाल्यानंतर तीव्र इच्छा असूनही अनेकांना निवडणूक लढता येत नाही. पण नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाल्यामुळे ही संधी आपल्यालाच मिळावी यासाठी अनेक जण सक्रिय झाले आहेत. राजकीय पक्ष व इच्छुकांकडून नवनवीन समीकरणे तयार करण्यास सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर थेट नागरिकांमधून नगराध्यक्ष निवडल्या जाणार आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीच्या काळात नाही तर इतर वेळेसही जास्तीत जास्त चांगला जनसंपर्क ठेवणाऱ्या उमेदवाराला फायदा होणार आहे. यातच इच्छुकांची वाढती संख्या पाहता सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे पुन्हा एकदा आपली ताकद आजमावतात की एकामेकांशी हातमिळवणी करून निवडणुकीला सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
बुधवारी (दि.५) नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच शहराच्या कानाकोपऱ्यात फक्त हाच विषय सर्वांच्या तोंडावर दिसून येत होता. एका प्रभागात दोन सदस्य अशी यंदाची प्रभाग रचना राहणार असून यासोबतच आता नगराध्यक्षाची निवड जनतेतून करण्याचा नवा प्रयोग शासनाकडून केला जात आहे. शहरातील प्रभागांचे आरक्षण जाहीर होऊन बराच वेळ झाला व आपापल्या प्रभागाला घेऊन आजी-माजी, विद्यमान व इच्छूकांकडून तयारीही केली जात आहे. मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होण्यास उशिर झाल्याने त्याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता होती. कधी आरक्षण निघते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यातच सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद निघाल्याचे कळताच खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसह सर्वांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
विशेष म्हणजे सध्या नवरात्रीची धामधूम सुरू असून कुणीही अन्य विषयांवर बोलताना दिसत नव्हते. आता सामना रंगणार हेच वाक्य सर्वांच्या तोंडातून निघाले. काही माजी तर काही विद्यमान सदस्यांच्या आशा यामुळे पल्लवीत झाल्या आहेत. याशिवाय आता सर्वांनाच रान मोकळे असल्याने यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. आता राष्ट्रीय पक्षांकडून कुणाला तिकीट मिळते, कुणाला अपक्ष मैदानात उतरावे लागते यावरही बरेच गणित अवलंबून राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)
समर्थकांनी फोडले फटाके
गोंदियाचे नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरात काही इच्छुकांच्या समर्थकांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. आता सर्वांसाठी ही निवडणूक मोकळी झाली त्यामुळे कुणीही रिंगणात उतरू शकणार असल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व्यक्त केला. यंदा नगराध्यक्ष जनतेला निवडून द्यायचा असल्याने त्यासाठी स्वच्छ प्रतिमा, सर्वांसाठी धावून जाणारा, जनतेत दांडगा जनसंपर्क अशा बाबी महत्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षेत खरा उतरणारा कोण ठरतो, आता हे येणारा काळच दाखविणार आहे.
सन २००२ नंतर दुसऱ्यांदा प्रयोग
नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा हा प्रयोग यापूर्वी सन २००२ मध्ये करण्यात आला. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे के.बी.चव्हाण हे जनतेतून निवडून आले होते. शहरवासीयांच्या काय तर जिल्हावासीयांच्या सदैव स्मरणात राहणार अशी ही निवडणूक झाली होती. कारण या निवडणुकीत ‘कन्हैया मौसी’ नामक तृतीयपंथी रिंगणात उभी होती. सन २००२ ते २००७ अशा चव्हाण यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर आता पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा प्रयोग केला जात आहे.