पोवारीटोला येथे तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:13 PM2019-06-11T22:13:35+5:302019-06-11T22:13:57+5:30
आमगाव नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या पद्मपूर पोवारीटोला येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आमगाव नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या पद्मपूर पोवारीटोला येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे येथील संप्तत नागरिकांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करुन तहसीलदार डी.एस.भोयर यांना निवेदन दिले.
आमगाव देवरी मुख्यमार्गावर असलेल्या पोवारीटोला येथील नागरिकांना भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. येथील नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेकडे नळ योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली. पण अद्यापही त्याची पूर्तता करण्यात आलीे नाही. परिणामी येथील नागरिकांना पाण्यासाठी पायापीट करावी लागत आहे.
पोवारीटोलासह पाणी टंचाईची झळ आमगाव रिसामा, किडंगीपार, बिरसी, बनगाव, कुंभारटोली, माल्ही व पदमपूर या गावांना सुध्दा बसत आहे. आमगाव वळगता उर्विरत गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र आमगाव शहराची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पुरेशी नाही. पाणी पुरवठा योजनेच्या पाणी टाकीत दररोज लागणाºया पाण्यापेक्षा कमी प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे अल्प प्रमाणात पाणीे पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला दररोज चार लाख लिटर पाण्याची गरज आहे. पण, पाण्याची साठवण क्षमता केवळ २ लाख २५ हजार लिटरची आहे. त्यामुळेच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील विहिरी, बोअरवेल सुध्दा कोरडया पडल्या आहेत. ज्या विहिरींना पाणी आहे. त्यावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या मार्गी लावण्यात यावी. यासाठी सिंधू देशकर, सोमेश्वरी रहांगडाले, शुभांगी रहांगडाले, युवराज रंगारी, राजकुमार देशकर आणि इतर नागरिकांनी नगर परिषदेचे प्रशासक डी.एस.भोयर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ही समस्या मार्गी न लागल्यास याविरुध्द तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.