बलात्कारी पाहुण्याला ३२ वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 05:00 AM2022-06-01T05:00:00+5:302022-06-01T05:00:06+5:30
प्रवीण परसराम कुसराम (२३, रा. भजेपार, ता. सालेकसा) असे आरोपीचे नाव आहे. १२ नोव्हेंबर २०१८ ला आरोपी हा पीडितेच्या घरी पाहुणा म्हणून आला होता. त्याला मार्केटमध्ये मटण घेण्यासाठी पाठविले असता, आरोपीने पीडित मुलीला बाजारात घेऊन जातो म्हणून पीडितेला सोबत घेऊन मोटारसायकलने बाजारात न जाता रस्त्यात झुडपी जंगलात नेऊन त्या मुलीवर नैसगिक व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी तालुक्यात १३ नोव्हेंबर २०१८ ला पाहुणा म्हणून आलेल्या नराधमाला मटण आणण्यासाठी मुलीच्या आईने पाठविले. मटण घेण्यासाठी जाताना तो ११ वर्षीय मुलीला बाजारात घेऊन गेला. परंतु त्याने तिला बाजारात न नेता रस्त्यातील झुडपी जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कारी आरोपीला प्रमुख जिल्हा विशेष सत्र न्यायाधीशांनी ३२ वर्षे सश्रम कारावास व १ लाख २ हजार रुपये दंड ठोठावला. ही सुनावणी ३० मे रोजी करण्यात आली.
प्रवीण परसराम कुसराम (२३, रा. भजेपार, ता. सालेकसा) असे आरोपीचे नाव आहे. १२ नोव्हेंबर २०१८ ला आरोपी हा पीडितेच्या घरी पाहुणा म्हणून आला होता. त्याला मार्केटमध्ये मटण घेण्यासाठी पाठविले असता, आरोपीने पीडित मुलीला बाजारात घेऊन जातो म्हणून पीडितेला सोबत घेऊन मोटारसायकलने बाजारात न जाता रस्त्यात झुडपी जंगलात नेऊन त्या मुलीवर नैसगिक व अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. हे प्रकरण कुणालाही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी मुलीला दिली. आरोपीने तिला घरी सोडून स्वत:च्या गावी पळून गेला. यासंदर्भात १३ नोव्हेंबर रोजी देवरी येथे आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार पाटील यांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (अ) (ब), ३७७, ५०६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६, ८ अंतर्गत तपास केला. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सतीश यू. घोडे व विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी एकूण ९ साक्षीदारांची न्यायालयासमोर साक्ष नोंदविली.
अशी सुनावली आरोपीला शिक्षा
- या आधारावर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर. औटी यांनी आरोपीविरुद्ध सरकारी पक्षाचा कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय अहवाल, रासायनिक परीक्षण अहवाल व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीला भादंवि कलम ३७६ अ, ब अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ वर्षांचा अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ३७७ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ वर्षांचा अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ५०६ अंतर्गत २ वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सश्रम कारावास, अशी एकूण ३२ वर्षे सश्रम कारावासाची व १ लाख २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दंडाची रक्कम पीडितेस
- मनोधैर्य योजनेंतर्गत पीडितेच्या वैद्यकीय उपचार व पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणला योग्य साहाय्य करण्यासाठी आदेश केले आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगणजुडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक ब्रिजलाल राऊत यांनी सहकार्य केले.