बलात्कारी संगीत शिक्षकाला ११ वर्षाचा सश्रम कारावास; जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
By नरेश रहिले | Published: January 31, 2023 04:42 PM2023-01-31T16:42:02+5:302023-01-31T16:46:11+5:30
१७ हजार रूपये दंडही ठोठावला
गोंदिया : संगीतचे धडे देता-देता अल्पवयीन मुलीचे लैंगीक शोषण करणाऱ्या संगीत शिक्षकाला ३१ जानेवारी रोजी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने ११ वर्षाचा सश्रम कारावास व १७ हजार रूपये दंड ठोठावला. नईम खान पठान (४०) रा. संत रविदास वार्ड, तिरोडा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही सुनावणी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी केली आहे.
आरोपी संगीत शिक्षक नईम खान पठान हा संगीत शिक्षक म्हणून तिरोडा येथे मुलांना संगीतचे धडे देण्याचे काम करित होता. पिडित मुलगी १४ वर्षाची आहे. ती इतर मुलामुलींसोबत आरोपीकडे येथे संगीतच्या शिकवणी वर्गाला सन २०१७ ते २०२० पर्यंत जात होती. पिडितेचे ही १४ वर्षाचे असल्याने आरोपीने पिडितेला प्रेमाच्या भुलथापा देऊन तसेच तिचे भविष्य बनवून देण्याचे आमिष दाखवून पिडितेचा वारंवार लैंगिक शोषण करित होता. ही घटना कुणालाही न सांगण्याकरिता बाध्य करित होता. याव्यतिरिक्त आरोपीने सप्टेंबर २०२० मध्ये पिडितेला पळवून नेले. तिचे लैंगिक शोषन केले. ही गोष्ट पिडितेच्या आई - वडिलाला माहिती झाल्यावर पिडितेच्या वडिलांनी ९ सप्टेंबर २०२० रोजी तिरोडा पोलिसात तक्रार केली.
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी तपास करून आरोपीविरूध्द दोषारोप पत्र सादर केले. एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपी नईम खान पठान (४०) संत रविदास वार्ड, तिरोडा याला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी काम पाहिले.
न्यायालयाच्या कामकाजासाठी पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरिक्षक दिनेश तायडे यांच्या देखरेखीत पैरवी कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शंकर साठवने यांनी काम पाहिले.
अशी सुनावली शिक्षा
भारतीय दंड विधानाचे कलम ३६३ अंतर्गत ३ वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास, भारतीय दंड विधानाचे कलम ३६६ अंतर्गत ५ वर्षांचा सश्रम कारावास व ७ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये ३ वर्षाचा सश्रम कारावास व ३ हजार रूपये व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी एकुण १९ वर्षाचा सश्रम कारावास व एकूण १७ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
७ साक्षदार तपासले
या प्रकरणात जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार, पिडित पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी एकुण ७ साक्षदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले.
दंडाची रक्कम पिडीतेला द्या
या प्रकरणातील विविध कलमांतर्गत १७ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही दंडाची रक्कम पिडितेला देण्याचे आदेश दिले. सानुग्रह अनुदानाकरिता योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा व विशेष सत्र न्यायालया ने दिले आहे.