पहिल्यांदाच दिसले दुर्मीळ 'माकड कोड फुलपाखरू'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:34 PM2023-09-11T13:34:05+5:302023-09-11T13:35:23+5:30

नवेगाव राष्ट्रीय उद्यान : दक्षिण-पूर्वेकडील राज्यात आढळतात

Rare 'monkey puzzle butterfly' spotted for first time in gondia | पहिल्यांदाच दिसले दुर्मीळ 'माकड कोड फुलपाखरू'

पहिल्यांदाच दिसले दुर्मीळ 'माकड कोड फुलपाखरू'

googlenewsNext

गोंदिया : सप्टेंबर महिना हा ‘बीग बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो. या फुलपाखरू महिन्याच्या निमित्ताने नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखरांच्या विविधतेच्या हंगामी सर्वेक्षणात नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या जांभळी गेटजवळ दुर्मीळ माकड कोड किंवा ‘मंकी पजल’ फुलपाखरू (राथिंडा अमोर) नुकतेच दिसून आले. जैवविविधता अभ्यासक व स्थानिक एस. एस. जायस्वाल महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. गोपाल पालीवाल, प्रा. भीमराव लाडे (धाबेपवनी), प्रा. डॉ. सुधीर भांडारकर यांनी प्रथमच या दुर्मीळ फुलपाखराची माहिती दिली.

यापूर्वी या फुलपाखरूची नोंद भारतातील दक्षिण आणि पूर्वेकडील राज्ये केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, छत्तीसगड, गोवा, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रात डॉ. टिपले आणि डॉ. भागवत यांनी याच वर्षी यापूर्वी नोंदविले आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात कोरड्या मिश्र जंगलापासून पावसाच्या जंगलापर्यंतच्या वनस्पतींच्या विविधतेसाठी लोकप्रिय आहे. हे दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय कोरडे जंगल वैविध्यपूर्ण वन्यजिवांनी समृद्ध आहे आणि मध्य भारतातील एक महत्त्वाचे संरक्षण घटक आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यानात विविध कुटुंबांतील सुमारे ७० प्रजातींची फुलपाखरे यापूर्वीच दिसली आहेत.

‘मंकी पझल बटरफ्लाय’ हे ‘लाइकेनिड’ कुटुंबातील एक आकर्षक फुलपाखरू आहे. नवेगाव नॅशनल पार्कच्या जांभळी गेटजवळ इक्सोरा (जंगल जीरॅनियम) वनस्पती वर हे दिसून येते. इक्सोरा वनस्पती हे माकड कोड फुलपाखराच्या यजमान वनस्पतींपैकी एक आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. ईश्वर मोहर्ले, डॉ. अरुण झिंगरे, रूपेश निंबार्ते, छत्रपाल चौधरी, कुलदीपसिंह बाच्चिल, प्रवीण रणदिवे, विवेक बावनकुळे यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी संशोधकांनी त्यांचे कौतुक केले आहे.

असे पडले असेल नाव

- या फुलपाखराचे सामान्य नाव त्याच्या पंखांखाली दिसणाऱ्या गुंतागुंतीच्या कोड्यासारखे पॅटर्नमुळे किंवा त्याच्या विशिष्ट लँडिंग पॅटर्नमुळे असू शकते असे अभ्यासकांनी सांगितले.

Web Title: Rare 'monkey puzzle butterfly' spotted for first time in gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.