सिरेगावबांध परिसरात आढळला दुर्मीळ, छोटा क्षत्रबलाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:00 AM2021-12-26T05:00:00+5:302021-12-26T05:00:17+5:30
सिरेगावबांध परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेल्या चमूला दुर्मीळ छोटा क्षत्रबलाक आढळला. या चमूत दादा राऊत, डॉ. शरद मेश्राम, मिथुन चव्हाण, अरविंद गजभिये, छत्रपाल शहारे आणि गौरव बेलगे यांचा समावेश होता. सिरेगाव तलाव अतिशय विस्तीर्ण असून येथे दरवर्षी शेकडो स्थलांतरित पक्षी येत असतात. त्यात विविध पक्ष्यांसह छोटा क्षत्रबलाक हा पक्षी आढळला. साधारण गेल्या १० वर्षांपासून या परिसरात हा पक्षी दिसून आला नव्हता. १० वर्षे आधी तर नवेगावमध्ये आढळला होता.
संतोष बुकावन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया हा ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात जिल्ह्यातील तलाव, पाणवठ्यांवर विविध देशी-विदेशी पक्षी आढळतात. सिरेगावबांध परिसरात दुर्मीळ, छोटा क्षत्रबलाक हा पक्षी शनिवारी आढळला. पक्षी व निसर्गप्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे.
हिरवळ गोंदियाच्या वतीने नवेगावबांध परिसरात स्थलांतरित पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिरेगावबांध परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेल्या चमूला दुर्मीळ छोटा क्षत्रबलाक आढळला. या चमूत दादा राऊत, डॉ. शरद मेश्राम, मिथुन चव्हाण, अरविंद गजभिये, छत्रपाल शहारे आणि गौरव बेलगे यांचा समावेश होता. सिरेगाव तलाव अतिशय विस्तीर्ण असून येथे दरवर्षी शेकडो स्थलांतरित पक्षी येत असतात. त्यात विविध पक्ष्यांसह छोटा क्षत्रबलाक हा पक्षी आढळला. साधारण गेल्या १० वर्षांपासून या परिसरात हा पक्षी दिसून आला नव्हता. १० वर्षे आधी तर नवेगावमध्ये आढळला होता.
तेव्हापासून या पक्ष्याचा ठावठिकाणाचा कुठेही उल्लेख नव्हता. सिरेगाव परिसरात हा पक्षी दिसल्याने निसर्गप्रेमींच्या आनंदात मोलाची भर पडली आहे.
पक्षी अभयारण्याची मान्यता द्या
नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प आहे. येथे अनेक पर्यटक येतात. या परिसरात विविध जातींचे दुर्मीळ पक्षी आवर्जून दिसतात. हे पक्षी अभयारण्य घोषित झाल्यास पर्यटकांच्या व पक्षी अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच ठरेल. स्थलांतरित पक्षी हे खाद्य व सुरक्षितता या दृष्टीने येथे मोठ्या संख्येत येतात.
- प्रा डॉ. शरद मेश्राम, पक्षीप्रेमी
ही आहेत या पक्ष्याची वैशिष्ट्ये
- छोटा क्षत्रबलाक पक्षी असुरक्षित किंवा चिंताजनक या वर्गवारीमध्ये असून तो अतिशय दुर्मीळ असल्याचे सांगितले जाते. नदी, तलाव, गोड्या पाण्याचे जलाशय, चिखलाचा प्रदेश या भागांत साधारणपणे तो आढळतो. याची लांबी ८७ ते ९३ सेंटिमीटर असून त्याचे वजन ४ किलो ते पावणेसहा किलो एवढे असते. त्याची उंची ११० ते १२० सेंटीमीटर असते. त्याच्या पंखांचा विस्तार ५.७५ ते ६६ सें.मी. एवढा असतो. त्याच्या मानेचा रंग पिवळसर व केशरी असून, त्याच्या मानेवर विखुरलेले पंखांचे केस असतात. पंखांचा रंग राखाडी असून पोटाचा भाग पांढरा असतो. त्याचे पाय राखाडी रंगाचे असतात. जानेवारी ते जुलै हा त्याचा प्रजनन काळ असतो. प्रजनन काळाच्या व्यतिरिक्त तो एकट्यानेच राहणे पसंत करतो. मासे ,बेडूक, सरपटणारे प्राणी, उंदीर, लहान सस्तन प्राणी हे त्याचे खाद्य आहे.