शिधा वाटपात अनियमिततेचा आरोप
By admin | Published: June 17, 2016 02:08 AM2016-06-17T02:08:24+5:302016-06-17T02:08:24+5:30
येरंडी-देवी येथील शिधापत्रिका धारकांना धान्यवाटप करताना सावळागोंधळ करीत असल्याची तक्रार शिधाधारकांनी केली आहे.
अर्जुनी-मोरगाव : येरंडी-देवी येथील शिधापत्रिका धारकांना धान्यवाटप करताना सावळागोंधळ करीत असल्याची तक्रार शिधाधारकांनी केली आहे. तालुका प्रशासनाकडे तक्रार करूनही याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोपही शिधाधारकांनी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, धनराज दोनोडे, सईबाई थेर, रामदास ब्राम्हणकर यांच्याकडे प्रत्यक्ष कमी लाभधारक असतानाही अधिकचे दर्शविण्यात आले. मात्र त्यांना प्रत्यक्षात कमी धान्य दिले जात असल्याने आरोप केला जात आहे. बोंडकू ब्राम्हणकर, तुकाराम रामटेके, मारुती रामटेके, मनोराम दोनोडे, देविदास हेमणे, इस्तारी तवाडे, महादेव तरोणे, सहादेव ब्राम्हणकर, पोवरा बहेकार, केवळराम दोनोडे तसेच अत्यंत गरीब असलेल्या शिधा धारकांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नाही. मृत शिधाधारकांचे धान्य हडप केले जाते.
ग्रामपंचायतच्या ठरावांना न जुमानता मर्जितील सधन शेतकऱ्यांची नावे अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
केवळ १ ते २ दिवस अन्नधान्याचे वाटप केले जाते व उर्वरित धान्य हडप केले जाते. धान्य विक्रीची पावती दिली जात नाही. शासकीय दरापेक्षा अधिकचे पैसे घेतले जातात. फलकावर धान्याचे वितरण व दर लिहिले जात नाही. दारिद्र्यरेषेखालील लाभधारकांना कमी धान्य दिले जाते. दर महिन्याला ५५० ते ६०० लिटर केरोसिनचा पुरवठा होतो. मात्र परिपत्रकानुसार वाटप केले जात नाही. गहू, तांदूळ, साखरेचा पुरवठा होऊनही तुमचे धान्य आले नाही असे सांगून परत पाठविले जाते. यात लतेश बहेकार, जनार्धन दोनोडे, किशोर बोरकर, रामेश्वर लोगडे, हेमराज हेमणे, हिवराज कोरे, गोवर्धन बहेकार, उदाराम शिवणकर, शंकर लोगडे, जसवंता दोनोडे, नकटू मेंढे, पांडुरंग बहेकार, श्रीराम बहेकार, आसाराम मेंढे यांना धान्य मिळत नसल्याची तक्रार आहे.
अंत्योदय अन्न योजनेसाठी विहीरगाव-बरड्या येथील ५ व येरंडी देवी येथील ६ लाभार्थ्यांची निवड करुन आमसभेत ठराव घेण्यात आला. ही यादी अंमलबजावणीसाठी ११ डिसेंबर २०१३ रोजी तहसील कार्यालयात पाठविण्यात आली. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. अनेकदा तक्रार करुनही कुठलीच कारवाई केली जात नाही.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बकाराम ब्राम्हणकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)