रतनारा ग्रा.पं.ने फेटाळला न.प.चा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:10+5:30
नगर परिषदेकडे स्वत:चे घनकचरा प्रकल्प असणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही शंभरी गाठणाºया गोंदिया नगर परिषदेकडे प्रकल्प काय तर अद्याप प्रकल्पासाठी जागाच नसणे ही शोकांतिका आहे. परिणामी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मोक्षधाम परिसर तसेच शहरा लगत ग्रामीण भागात कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी नगर परिषदेने पाहून ठेवलेली ग्राम रतनारा येथील जागा हातून गेली आहे. प्रकल्पाला जागा देण्याच्या प्रस्तावाला ग्रामसभेने विरोध दशर्वित तसा ठराव घेतला आहे. परिणामी नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठीचा विषय पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. मात्र नगर परिषद आता अन्यत्र जागा शोधत आहे.
नगर परिषदेकडे स्वत:चे घनकचरा प्रकल्प असणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही शंभरी गाठणाºया गोंदिया नगर परिषदेकडे प्रकल्प काय तर अद्याप प्रकल्पासाठी जागाच नसणे ही शोकांतिका आहे. परिणामी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून मोक्षधाम परिसर तसेच शहरा लगत ग्रामीण भागात कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. यामुळे मात्र शहरासह ग्रामीण भागातील वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार सुरू आहे.मागील ४-५ वर्षात स्थापित नगर पंचायत आपले प्रकल्प उभारत असताना गोंदिया नगर परिषद १०० वर्षांत साधी जागा मिळू शकली नाही. हा गंभीर व तेवढाच लज्जास्पद विषय आहे. विशेष म्हणजे, गोंदिया नगर परिषदेने कधी टेमनी, कधी रापेवाडा तर आणखीही जागांचा शोध घेतला आहे. मात्र काहीना काही कारणांमुळे त्यांना यश आले नाही. अशात मागील सुमारे २ वर्षांपूर्वी नगर परिषदेने ग्राम रापेवाडा येथे प्रकल्पासाठी जागा बघून ठेवली होती. मात्र त्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न झाल्याने हा विषय रेंगाळत चालला होता.
अशात ‘लोकमत’ने ग्राम चुरोद परिसरात कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आणल्याने टास्क फोर्सने नगर परिषदेला १ महिन्याच्या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याबाबत नोटीस पाठविली आहे. याची धास्ती घेत नगर परिषद कामाला लागली आहे. मात्र जागेच्या विषयाला घेऊन २६ जानेवारी रोजी रतनारा ग्रामपंचायतने ग्रामसभेत जागेचा प्रस्ताव ठेवला. शहरातील कचरा आपल्या गावात येणार ही बाबच गावकऱ्यांना खटकणारी ठरली व गावकºयांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत विरोधात ठराव घेतला. यामुळे आता रतनारा येथे प्रकल्प उभा करण्याची नगर परिषदेची योजना पूर्णपणे फसली आहे.
आता कारंजा येथे जागेसाठी प्रयत्न
रतनारा येथील जागेचा विषय संपल्यानंतर आता नगर परिषदेने जवळील ग्राम कारंजा येथील जागेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुमारे ४-५ एकर जागा यासाठी पाहण्यात आली असून वन विभागाची ही जागा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ही जागा मिळणार असल्याचे दिसत आहे. या जागेसाठी कारंजा ग्रामपंचातने विशेष ग्रामसभा बोलाविली असून त्यात हा जागेचा विषय निकाली निघणार आहे.ही जागा मिळाल्यावर नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्प उभा होणार असे दिसून येत आहे.
स्वच्छता विभागाचे हातवर
ग्राम चुलोद येथे शहरातील कचरा टाकला जात असतानाच स्वच्छता विभागाने तो कचरा आपला नसल्याचे सांगत हातवर केले आहे. चुलोद परिसरात कचऱ्याचे ढिगार लागले असून तेथे नगर परिषदेची गाडी पाहण्यात आली आहे. असे असतानाही नगर परिषद स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक ही बाब फेटाळत असून तेथील कचऱ्याची उचल करण्यात आलेली नाही. अशात आता टास्क फोर्सने पुन्हा एकदा नोटीस धाडावी अशी वाट बघितली जात आहे असेच वाटत आहे.