सावधान..! गोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या कळपाची पुन्हा एन्ट्री, वनविभागाने दिला अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 11:52 AM2023-04-27T11:52:10+5:302023-04-27T11:53:55+5:30
भसबोळणच्या जंगलात हत्तींचा कळप
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या धानपिकाचे प्रचंड नुकसान केले, जीवितहानी झाली, त्यानंतर डिसेंबर महिन्यात हत्तीचा कळप जिल्ह्यातून माघारी परतला. परंतु बुधवारी (दि.२६) नवेगावबांध परिसरातील भसबोळण जंगलात हत्तीचा कळप दिसून आल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
गतवर्षी गोंदिया, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून शेतपिकाचे प्रचंड नुकसान केले होते. हा कळप निघून गेल्याने दहशतीत असलेल्या जिल्ह्याच्या जंगल व्याप्त गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. बुधवारी या कळपाची एन्ट्री मलकाझरी मार्गे झाली. सायंकाळी हा कळप राणीडोहच्या दिशेने गेल्याची माहिती आहे. हा कळप राणीडोहच्या मजुरांनी बघितल्याचे बोलल्या जाते.
वनविभागाचे कर्मचारी या कळपावर पाळत ठेऊन आहेत. हा कळप धाबेपवनीच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तो नेमका कोणत्या दिशेने जाईल हे तूर्तास सांगता येणार नाही. ज्या दिशेने पूर्वी मार्गक्रमण केले आहे. त्याच रस्त्याने त्यांचे आवागमन व संचार होत असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, गोठणगाव, वडेगाव बंध्या, केशोरी, येरंडी दररे, खोळदा-बोळदा व त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेशाचा मार्ग मागील काळात होता. पुन्हा हाच मार्ग कायम राहतो का हे बघणे औत्सुक्याचे आहे.