साहित्यासह संविधानाचे वाचन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:15 PM2018-11-19T21:15:05+5:302018-11-19T21:15:32+5:30
आपल्या संविधानानेही अधिकार दिले आहेत, सत्ता दिली आहे तसेच कर्तव्यही सांगितले. मात्र सध्याचे सत्ताधारी सत्ता मिळाल्यानंतर मात्र संविधानाने सांगितलेल्या कर्तव्याला विसरले आहे. ओबीसी समाजाला संविधान समजण्यासाठी साहित्याच्या वाचनासह संविधानाचे वाचनही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन समता प्रकाशनाचे संपादक प्रदीप गायकवाड यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपल्या संविधानानेही अधिकार दिले आहेत, सत्ता दिली आहे तसेच कर्तव्यही सांगितले. मात्र सध्याचे सत्ताधारी सत्ता मिळाल्यानंतर मात्र संविधानाने सांगितलेल्या कर्तव्याला विसरले आहे. ओबीसी समाजाला संविधान समजण्यासाठी साहित्याच्या वाचनासह संविधानाचे वाचनही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन समता प्रकाशनाचे संपादक प्रदीप गायकवाड यांनी केले.
ओबीसी सेवा संघाच्यावतीने सवैंधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत सहावे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलन आमगाव तालुक्यातील तिगाव येथे रविवारी आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.ओबीसी सेवा संघाचे संस्थापक इंजि.प्रदीप ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या वेळी कवियत्री अंजनाबाई खुने,मार्गदर्शक म्हणून साहित्यिक व कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, राष्टÑीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, पं.स. सदस्य अशोक पटले,ओबीसी महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा खोटेले,सेवा संघाचे अध्यक्ष भय्याजी लांबट, कन्हैया बोपचे, स्वागताध्यक्ष व तिगावंचे सरपंच नरेंद्र शिवणकर, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमरकर, ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे, माजी कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, उदय टेकाडे, हरीश कोहळे, कैलास भेलावे, दिनेश हुकरे, लीलाधर गिरेपुंजे, रवींद्र शहारे उपस्थित होते. साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीने करण्यात आली.
संविधानाच्या जयघोषासह जय ओबीसीच्या घोषणेने परिसर दुमदुमला होता. संमेलनाचे उद्घाटन सविंधान व महापुरु षांच्या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. गायकवाड म्हणाले,ओबीसी साहित्य संमेलनातून ओबीसी साहित्यिकांची ओळख जनतेला व्हायला हवी आजही आमच्या ओबीसी बहुजन साहित्यिंकाना दुय्यम लेखले जात असल्याचे सांगत महाराष्ट्रातील पहिले कादंबरीकार कुणी असतील तर ते बहुजन समाजातील बाबा पदमनजी आहेत.
परंतु इतिहासात बाबा पदमनजी यांचे नावच सांगितले गेले नाही. कारण आपल्या समाजाला आधी शिक्षणाचा अधिकार नव्हता, शिक्षण नव्हते त्यामुळे आपण लिखाणही करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी आमच्यासाठी खुला केलेला मार्ग प्रत्येक ओबीसी व बहुजनांनी स्वीकारून त्यास जिवंत ठेवण्यासाठी अशा संमेलनाची गरज आहे.
महात्मा फुल्यांचे साहित्य हे आधुनिक काळात ओबीसी समाजासाठी खरे मार्गदर्शक ठरणारे आहे. ओबीसी बहुजन संतांची मोठी परंपरा असून ओबीसी साहित्याच्या क्षेत्रात संत नामदेवांचा उल्लेख केल्याशिवाय संत साहित्य पूर्ण होऊ शकत नाही. संत चोखामेळा ते तुकारामापर्यंतची संत परंपरा ही कुळ, जाती व धर्माच्या बेड्या तोडणारी होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान हे सर्वधर्मसमभाव जपणारे असल्यानेच सर्वांना समानसंधी प्राप्त होत असल्याचे ते म्हणाले.
या वेळी विदर्भाच्या बहिणाबाई अंजनाबाई खुने यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना मला पुरस्काराची काहीही गरज नाही मात्र समाजात शांतता व सर्वधर्मभावना रु जविण्याची गरज असून शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. नेत्यांनी सत्तेत आल्यावर जनतेला विसरता कामा नये, जनतेचा पैसा खाऊ नये, न्याय देताना अन्याय करू नये अन्यथा तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याला सन्मान द्या तो देशाची शान असल्याचे सांगितले.