२३ लाख पुस्तकांतून ‘वाचन प्रेरणा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 09:15 PM2018-10-21T21:15:29+5:302018-10-21T21:16:42+5:30
दप्तरविरहित दिन व वाचन आनंद दिन म्हणून गोंदिया जिल्ह्याने सुरुवात केली. हा उपक्रम अख्ख्या महाराष्ट्रात राबविण्यात आला. १५ आॅक्टोबर रोजी एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दप्तरविरहित दिन व वाचन आनंद दिन म्हणून गोंदिया जिल्ह्याने सुरुवात केली. हा उपक्रम अख्ख्या महाराष्ट्रात राबविण्यात आला. १५ आॅक्टोबर रोजी एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते.
यात यंदा जिल्ह्यातील २ लाख २८ हजार १९२ विद्यार्थ्यांनी २३ लाख पुस्तकांचे वाचन करून डॉ. कलाम यांना अभिवादन केले. जिल्ह्यात सुरूवात करण्यात आलेल्या वाचन आनंद दिन कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाने माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती (१५ आॅक्टोबर) वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले.
त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातील १६३३ शाळेत हा दिवस साजरा करण्यात आला. यात २ लाख २८ हजार २९२ विद्यार्थ्यांनी २३ लाख पुस्तकांचे वाचन केले. यांतर्गत, एका विद्यार्थ्याने किमान १० पुस्तकांचे वाचन केले आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी व सदर दिवशी दप्तरमुक्त व हातधूवा दिवस सर्व शाळांमध्ये राबविण्यात आला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने सरासरी १० पुस्तकांचे वाचन करण्यासाठी शाळांमध्ये पुस्तके ठेवण्यात आली होती. काही शाळांमध्ये टॅब व संगणकाद्वारे आॅनलाईन पद्धतीने अधिकृत पुस्तक अॅप्स उपलब्ध करुन पुस्तकांचे वाचन करण्यात आले. जेथे पुस्तके कमी जाण्याची शक्यता होती त्या ठिकाणी सार्वजनिक ग्रंथालय, शिक्षणप्रेमी, युवक मंडळे, शिक्षक यांच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करण्यात आली.
जिल्ह्यात १५ आॅक्टोबर रोजी सर्व शाळांमध्ये सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते व नियोजनानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने किमान १० (१६ पुष्ठे) पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी याकरिता शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना नियोजनाप्रमाणे सहकार्य केले.
गोंदियात ७७ हजार विद्यार्थ्यांनी केले वाचन
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २१२ शाळांतील २७ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी वाचन केले. आमगाव तालुक्यातील १५९ शाळांतील २२ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी वाचन केले. देवरी तालुक्यातील २०० शाळांतील १९ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी वाचन केले. गोंदिया तालुक्यातील ४०८ शाळांतील ७७ हजार ७११ विद्यार्थ्यांनी वाचन केले. गोरेगाव तालुक्यातील १५८ शाळांतील १८ हजार ११७ विद्यार्थ्यांनी वाचन केले. सालेकसा तालुक्यातील १४८ शाळांतील १६ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी वाचन केले. सडक-अर्जुनी तालुक्यातील १५४ शाळांतील १७ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी वाचन केले. तिरोडा तालुक्यातील १९४ शाळांतील २८ हजार ७६ विद्यार्थ्यांनी वाचन केले.