रोपवाटिका वृक्ष लागवडीसाठी सज्ज
By admin | Published: June 26, 2017 12:21 AM2017-06-26T00:21:52+5:302017-06-26T00:21:52+5:30
अर्जुनी-मोरगाव ते सानगडी या प्रमुख मार्गावर मुख्य दर्शनी सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने मागील
उच्च तंत्रज्ञानाद्वारे रोपनिर्मिती : विविध प्रजातींची १.७५ लाख रोपे
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव ते सानगडी या प्रमुख मार्गावर मुख्य दर्शनी सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने मागील २-३ वर्षापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेची निर्मिती करण्यात आली. प्रशस्त अशा २ हेक्टर जागेमध्ये रोपवाटिका सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक प्रविणकुमार बडगे यांच्या सूचक मार्गदर्शनानी क्षेत्रीय कर्मचारी एन.एम. शुक्ला यांच्या कार्यकुशलतेनी आजघडीला रस्त्यालगत उभी असलेली रोपवाटिका हिरव्या कंच रुपात फुललेली आहे. रोपांची झालेली वाढ निश्चितपणे आकर्षित करुन येत्या १ जुलै रोजी होणाऱ्या ४ कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी रोपवाटिका सज्ज झालेली आहे.
प्रशस्त अशा खुल्या परिसरात असलेली रोपवाटिका निसर्गरम्य वातावरणातील हिरवा शालू पांघरलेली दिसत आहे. रोपवाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रजातींचे बीज गोळा करुन तिथे रोपांची निर्मिती केली जाते. रोपवाटिकेचा सर्व परिसर बंदिस्त असून आतमध्ये नियोजनबद्ध रोपांची निर्मिती केली जात आहे. रोपांना हवा खेळती मिळावी. पोषक वातावरणामुळे रोपांची वाढ दिवसागणिक वाढावी यासाठी स्वतंत्र ६ रोपवाटिकांमधून रोपांची निर्मिती केली जात आहे. या रोपवाटिकेत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वड, शिशु, शिवठा, बांबू, सागवन, सिताफळ, आस्ट्रीयन बांबुळ, पळस, जाईळ, सप्तपर्णी, चार, चिंच, बेहळा, बेल, मुंगणा, किन्ही,कॅशिया, रिठा, करंजी, हत्तीफळ, आवया या जातीच्या ५० हजार रोपांची निर्मिती केली आहे.
दुसऱ्या रोपवाटिकेत २२ प्रजातींची ५५ हजार रोपे फुलविण्यात आली. ३ री रोपवाटिका ही वनमहोत्सव नावाने असून १६ प्रजातींच्या २५ हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.
४ थ्या वनमहोत्सव रोपवाटिकेत १२ प्रजातींची १० हजार रोपे तयार करण्यात आली. ‘पानवहाळ’ या ५ व्या रोपवाटिकेत १८ प्रजातींसह १० हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. ६ व्या रोपवाटिकेत १५ प्रजातीचे २५ हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. अशाप्रकारे विविध जातींची १ लाख ७५ हजार रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. रोपवाटिकेतील एकूण ३२ मजुरांच्या सहकार्यानी उच्च तंत्रज्ञानाद्वारे ठिकठिकाणाहून विविध बीज संकलन करुन रोपनिर्मिती केली जात आहे.
त्यावर तंत्रशुद्ध प्रक्रिया करुन रोपवाटिकेत बिजारोपण केले जाते. आजघडीला सागवान, बांबू, कडुलिंब, आंजन, मोह, जांभुळ, आंबा, बोर, चार, बेल, कुंभी, पळस, वळ, पिंपळ, बेहळा, शिश, शिवन, शिशु, जारुळ, गुलमोहर, प्लेटफार्म, कॅशिया, आष्ट्रीयन, बांभुळ, बांबूळ, मोवई, हत्तीफळ, करंजा, हिरडा इत्यादी जातीचे बीज ठिकठिकाणच्या जंगलातून जमा करुन रोपवाटिकेत आणून ठेवले आहेत. जमा झालेल्या बिजापासून प्रत्यक्षात मजुरांकरवी रोपांची निर्मिती करुन रोपवाटिका फुलविली आहे.
४ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत १ ते ७ जुलै दरम्यान होणाऱ्या राज्यव्यापी वृक्षारोपणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका सज्ज झाली असून मागणीनुसार रोपांची विभागणी करण्याचे काम प्रगती पथावर असल्याचे लागवड अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय कर्मचारी शुक्ला यांनी सांगितले.
३० हजार वृक्ष लागवड
लागवड अधिकारी सामाजिक वनकिरण अर्जुनी मोरगावच्या वतीने विविध ठिकाणी ३० हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी खड्डे खोदून जागा आरक्षित केली गेली. भिवखिडकी ते सानगडी मार्गावर दोन्ही बाजूस ३ हजार झाडे, देवलगाव ते सुरगाव मार्गावर २ हजार, खांबी ते चापटी रस्त्यावर २ हजार, खांबी ते मळेघाट रस्त्यावर २ हजार, ताडगाव ते तिडका मार्गावर १ हजार, झरपडा ते महालगाव रस्त्यावर २ हजार, बोरटोला पाणवहाळ साठी ९ हजार, विखुरलेले स्वरुप २ हजार व ईतर अन्य ठिकाणी विविध जातींचे ३० हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. शिवाय सदर रोपवाटिकेतील विविध रोपे विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी प्रती झाड ७ रुपये, मोठा पिशवीतील झाड ७० रुपये, एमआर ईजीएस रोपवाटिकेतील झाडा १२ रुपये प्रमाणे विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.