‘ई-पास’साठी कारणे दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार! (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:12 AM2021-05-04T04:12:57+5:302021-05-04T04:12:57+5:30
गोंदिया : जिल्ह्याबाहेर खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पास दिली जाते. ही ई-पास अत्यावश्यक सेवेसाठी किंवा अत्यंत निकडीच्या ...
गोंदिया : जिल्ह्याबाहेर खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पास दिली जाते. ही ई-पास अत्यावश्यक सेवेसाठी किंवा अत्यंत निकडीच्या कामासाठी देण्यात येते. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावून ब्रेक द चेन लॉकडाऊनला सुरूवात केली. या आदेशांतर्गत आता खासगी वाहनांना जिल्ह्याबाहेर जाण्या येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर जाता येईल किंवा जिल्ह्यात येता येईल. या आदेशाने अत्यावश्यक सेवेसाठी ये-जा करणाऱ्यांना वाहनांना सूट देण्यात आली आहे. नवीन आदेशाच्या अंतर्गत वाहन क्षमतेनुसार फक्त ५० टक्के परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी ऑनलाईन पोलीस विभागाच्या वेबसाईटवरून अर्ज करावा लागणार आहे.
......................
असा करावा अर्ज
सर्वात आधी वेबसाइट उघडून अर्जासाठी अप्लाय करावे, जिल्ह्याचे नाव, आपला नाव, केव्हापासून केव्हापर्यंत जायचे आहे. आपला मोबाईल नंबर, प्रवासाचे कारण, प्रवासाचा उद्देश, वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक, वर्तमान पत्ता, ईमेलचा पत्ता, प्रवास सुरू होण्याचे ठिकाण, प्रवास संपण्याचे ठिकाण, प्रवाशांची संख्या, प्रवास संपेल तो पत्ता, आपण कंटेन्मेंट झोनमधून आहात किंवा नाही याची माहिती द्यावी लागते.
............
ही कागदपत्रे हवीत
अर्जदाराचे नाव, केव्हापासून केव्हापर्यंत प्रवास करायचा आहे, अर्जदाराचा मोबाईल नंबर, प्रवासाचे कारण, प्रवासाचा उद्देश, वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक, वर्तमान पत्ता, ईमेल पत्ता, प्रवास सुरू होण्याचे ठिकाण, प्रवास संपण्याचे स्थान, प्रवाशांची संख्या, प्रवास संपण्याचा पत्ता, आपण कंटेन्मेंट झोनमधून आहात की नाही, परतीचा मार्ग कोणता राहील, वैद्यकीय प्रमाणपत्र, मृताचा मृत्यू दाखला, सर्व प्रवाश्ची आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजेन रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा अधिकृत डॉक्टरांचा अहवाल, ही कागदपत्रे द्यावी लागतात.
...........................
काही वेळातच मिळतो ई-पास
ई-पास करिता अर्ज सादर केल्यावर अर्जदाराला एक टोकन क्रमांक मिळतो. त्याचा स्क्रीन शॉट किंवा त्याला लिहून ठेवावे लागते. काही वेळातच वेबसाईटवर ई-पास डाऊनलोड असणाऱ्या विकल्पावर जाऊन टाेकन क्रमांक टाकून ऑनलाइन ई-पास डाऊनलोड करता येते. प्रवासाच्या दरम्यान ही ई-पास असणे आवश्यक आहे. या ई-पासचा दुरुपयोग केल्यास कारवाई किंवा १० हजार रुपये दंड केला जाऊ शकतो.
..........
सर्व अर्जदारांची तीच ती कारणे
ई-पास करिता अत्यावश्यक कारणे द्यावी लागतात. त्यासाठी रुग्णाला उपचारासाठी नेत आहे, तर नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जातो हे महत्त्वाची दोन कारणे नमूद केली जातात. अत्यावश्यक सेवेची किराणा, भाजीपाला, दूध, औषधे यांचीही कारणे नमूद केली जातात.
........
आठ दिवसात किती आले अर्ज- २००
आतापर्यंत दिले ई-पास- १२००
प्रलंबित-००