साखरीटोल्यातील रँचोची पुन्हा भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 09:48 PM2018-05-21T21:48:30+5:302018-05-21T21:48:45+5:30

वयाच्या १६ वर्षी हर्षने एका कबाडीत पडलेल्या लुनापासून नवीन सिंगल सीट बाईक तयार केली होती. तेव्हा ही बाईक सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती.

Recapture of Rakho Rakho | साखरीटोल्यातील रँचोची पुन्हा भरारी

साखरीटोल्यातील रँचोची पुन्हा भरारी

googlenewsNext
ठळक मुद्देहर्ष अग्रवालचा नवीन आविष्कार : सिंगल सीट बाईकनंतर मॉडीफाईड बाईक

सागर काटेखाये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : वयाच्या १६ वर्षी हर्षने एका कबाडीत पडलेल्या लुनापासून नवीन सिंगल सीट बाईक तयार केली होती. तेव्हा ही बाईक सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने एका जुन्या मोटारसायकलला नवीन रुप देऊन नवीन मॉडिफाईड बाईक तयार करुन पुन्हा सर्वांचे लक्ष वेधले असून साखरीटोल्यातील या रँचोची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
मनुष्याच्या कल्पना शक्तीने नवनवीन आविष्काराला जन्म दिला आहे. दररोज नवीन-नवीन शोध लावले जातात. नवीन यंत्र, नवीन तंत्र पुढे येत आहे. अनेक विद्यार्थी तंत्रज्ञानाकडे आकर्षिले जात आहेत. त्यासाठी शिक्षण-प्रशिक्षण घेऊन नवीन नवीन अविष्कार करतात. कुशल तांत्रीक ज्ञानाच्या आधारावर अनेक विद्यार्थ्यानी नव साधनांची निर्मिती केली आहे. थ्री इडियट चित्रपटातील रँचोने त्याच्यातील कल्पक बुध्दीच्या बळावर अनेक अवघड प्रयोग सोपे केले. तसाच काहीसा प्रयोग सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील हर्ष अग्रवाल याने केला आहे. स्वत:च्या कल्पकतेच्या बळावर त्याने मागील दोन वर्षांपासून दोन वेगवेगळ्या मॉडिफाईड बाईक तयार करुन त्याच्या कल्पकतेचा परिचय दिला आहे.
हर्षने कबाडीत पडलेल्या एका कंपनीच्या बाईकला चार हजारात विकत घेतले व स्वत:च्या टेक्नालॉजी वापरुन तिच्या प्रत्येक पार्टमध्ये बदल करुन नवीन बाईक तयार केली. पूर्णपणे तिला नवीन रुप बहाल केले. बाईकच्या मागच्या बाजूला सिंगल शॉकअप दिला. बरेचदा टू सिटर बाईक सीट समान असते परंतु टू सीटर बाईक तयार करताना यात बदल करुन त्याने वेगळे स्वरुप दिले. स्वत:ची टेक्नालॉजी वापरुन नवीन पध्दतीचा हॅन्डल तयार केला. पेट्रोल टँक नवीन पध्दतीने डिझाईन केली. एयर फिल्टर थंड हवा देणारे तयार केले. त्यामुळे गाडी गरम होण्याची समस्या दूर केली. हेडलाईटला वेगळे रुप दिले. स्कूटरच्या साईलेंसर बसविला.
एक लिटर पेट्रोलमध्ये किमान ७० किमीचा अ‍ॅवरेज मिळेल अशी अपेक्षा हर्षला आहे. बाईकचे चाक मात्र तेच ठेवले. एकंदरीत स्वत:च्या कल्पना शक्तीचा वापर करुन सुझूकी मॅक्स १००, गाडीला पूर्णत: हा नवीन स्वरूप दिले आहे. यापूर्वी हर्षने जुन्या लुनापासून नवीन बाईक तयार केली होती. त्याच्या कार्याची दखल घेवून नागपूर येथील आयआयटीच्या अभियंत्यांनी त्याची प्रशंसा केली होती. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात पार पडलेल्या तंत्र प्रदर्शनीत हर्ष अग्रवालने तयार केलेल्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला होता.त्याच्या या अविष्काराचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रकाशित केले होते हे विशेष. सालेकसासारख्या आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील एका खेडेगावात हर्षच्या रुपाने आॅटोमोबाईल इंजिनियर तयार होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मेक इन इंडियाचे स्वप्न साकारत आहे.

हर्षने यावर्षी बारावीची परीक्षा दिली. परीक्षा आटोपल्यानंतर बरेच विद्यार्थी पुढील करियरच्या दृष्टीने नियोजन करतात. काही परिवारासह बाहेगावी फिरायला जातात. मात्र हर्षेने असे काहीही न करता परीक्षा झाल्यानंतर सुट्यांच्या कालावधीत बाईक तयार केली. यासाठी त्याने कुणाचेही मार्गदर्शन घेतले नाही हे विशेष.

Web Title: Recapture of Rakho Rakho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.