तिरोडा पंचायत समितीला अनियमिततेचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:53 PM2019-06-10T21:53:06+5:302019-06-10T21:53:22+5:30
पंचायत समितीतंर्गत घरकुल, मनरेगासह विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र तिरोडा पंचायत समितीत मागील काही दिवसांपासून लाभार्थ्यांची कामे होत नसल्याचीे ओरड आहे. तसेच लक्ष्मी दर्शन झाल्यास त्वरीत कामे मार्गी लावली जात असल्याचा आरोप तालुक्यातील लाभार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करुन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : पंचायत समितीतंर्गत घरकुल, मनरेगासह विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र तिरोडा पंचायत समितीत मागील काही दिवसांपासून लाभार्थ्यांची कामे होत नसल्याचीे ओरड आहे. तसेच लक्ष्मी दर्शन झाल्यास त्वरीत कामे मार्गी लावली जात असल्याचा आरोप तालुक्यातील लाभार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करुन संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी केली आहे.
केंद्र व राज्य सरकारची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मजुरांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. ही योजना पहिल्यांदा दुष्काळग्रस्त गावात व जिल्ह्यात राबविली जात होती. पण केंद्र सरकारने कायदा तयार करुन ही योजना सर्वत्र लागू केली. रस्ते, पांदन रस्ते, नाला सरळीकरण, तलाव खोलीकरण, वृक्ष लागवड, घरकुल मंजुरी, जनावरांचे गोठे, कुकुट पालन शेड, सिमेंट रस्ते, शेततळे, रोपवाटीका, नाली, अनेक कामे केली जातात. मात्र तालुक्यात सुरू असलेल्या या सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. मग्रारोहयो अंतर्गत कामे अंदाजपत्रकानुसार करण्यात आली नाही. बाहेरील एजंसी किंवा अधिकारी, कनिष्ठ अभियंत्याच्या माध्यमातून या कामाचे मुल्याकंन केल्यास यातील मोठे गौडबंगाल पुढे येण्याची शक्यता आहे. नाला सरळीकरण, तलाव खोलीकरण, मुरुम, सिमेंट रस्ते, पांदण रस्ते, वृक्ष लागवड यात बोगस मोजमाप करण्यात आल्याचा आरोप आहे. मजुरांनी काम कमी केले असताना प्रत्यक्षात कागदावर अधिक काम दाखविण्यात आले आहे. सिमेंट रस्त्याची कामे ही कंत्राटदार मार्फत करण्यात आली असून कामाच्या हजेरी रजिस्टरवर बोगस मंजुरांची नोंद करण्यात आली आहे.जनावरांचे गोठे नियम व यादीनुसार न करता काही ग्रामसेवकांनी हितसंबंध जोपासून तयार केल्याचा आरोप आहे.या कामांचे अंदाज पत्रक दोन वर्षांपासून धूळ खात पडले आहे. ज्यांच्याकडून लक्ष्मीदर्शन झाले त्यांची कामे प्राधान्याने करण्यात आली.घरकुलांचे देयक कित्येक लाभार्थ्यांचे अद्यापही पंचायत समितीत पडले आहे. खैरलांजी येथील नरेंद्र गोंडाणे यांचे घर पूर्ण होऊनही मंजुरी दिली नाही. त्यामुळे त्यांची पंचायत समितीत पायपीट कायम आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना आपली मजुरी काढण्यासाठी पैसे दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे यासर्व प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाही करण्यासाठी लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. यासंपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास बरेच मोठे गौडबंगाल समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.