गोंदिया जिल्ह्यातील तीन शिक्षकांची मान्यता रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:48+5:302021-06-17T04:20:48+5:30
गोंदिया : महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम ९ नुसार नियुक्ती प्रक्रिया न राबविता भरती ...
गोंदिया : महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम ९ नुसार नियुक्ती प्रक्रिया न राबविता भरती प्रक्रिया घेतल्यामुळे तीन शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्या तिन्ही शिक्षकांना वैयक्तिक मान्यता व सेवासातत्य एकाच दिवशी ९ एप्रिल २०२० रोजी देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांंनी त्या तीन शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
उमादेवी तेजलाल ठाकरे, लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपार, ता. गोरेगाव, विश्वासराव कुंजीलाल रहांगडाले, समर्थ हायस्कूल दांडगोव, ता. गोंदिया व अश्विनी मधुकर हजारे, श्री समर्थ हायस्कूल चिखली, ता. तिरोडा जि. गोंदिया या तीन शिक्षकांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन नियुक्तीस मान्यता दिल्याची तक्रार करण्यात आली होती. एकीकडे भरती प्रक्रिया बंद असताना गोंदिया जिल्ह्यात भरती प्रक्रिया घेण्यास संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. या तीन शिक्षकांच्या विरूध्द जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती रमेश अंबुले यांनी तक्रार केली होती. संस्थेचे सचिव प्रमोद पटले व संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल पटले यांनी बेकायदेशीररित्या नियुक्त्या केल्याचा आरोप केला होता. संस्थेने शिक्षण सेवक व सेवासातत्य प्रस्तावावर तत्कालीन मुख्याध्यापक व सचिवांच्या सह्या करण्यात आल्याची बाबदेखील चौकशीत उघडकीस आली आहे.
..........................
या प्रकरणात गंगाझरी पोलिसांतही गुन्हा दाखल
यासंदर्भात शिक्षण उपसंचालक यांच्या दालनात झालेल्या सुनावणीत माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे म्हणाले, शालार्थ आयडी बाबतचा प्रस्ताव माझ्या स्वाक्षरीने गेला नाही. मान्यतेच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी नाही. संबंधित तिन्ही शिक्षकांच्या मान्यता प्रस्तावावर कुणाची स्वाक्षरी आहे हे मला माहीत नाही. या शिक्षकांच्या मान्यतेच्या नस्त्या पोलीस स्टेशनमध्ये जमा आहे. संस्थेव्दारे खोटे दस्तऐवज सादर करून वैयक्तिक मान्यता संस्थेव्दारे या कार्यालयातून मिळविल्या होत्या, अशा प्रकारची तक्रार गंगाझरी पोलीस ठाण्यात दाखल आहे.