गोंदिया जिल्ह्यात दहा वर्षांत यंदा प्रथमच रेकार्डतोड धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 03:38 PM2019-02-05T15:38:34+5:302019-02-05T15:41:26+5:30
धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदा धान पिकासाठी अनुकुल वातावरण लाभल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदा धान पिकासाठी अनुकुल वातावरण लाभल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळेच शासकीय धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत १२ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. ही मागील दहा ते पंधरा वर्षातील सर्वाधिक खरेदी असून धान खरेदी केंद्र पुन्हा दोन महिने सुरू राहणार असल्याने यंदा खरेदीचा नवीन विक्रम स्थापन होण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. यंदा धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे ५७ व आदिवासी विकास महामंडळाचे ४३ असे एकूण शासकीय धान खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरू करण्यात आले. या केंद्रावर शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार अ दर्जाच्या धानाला १७७० ते सर्वसाधारण धानाला १७५० रुपये हमीभाव देऊन याच दराने धान खरेदी केली जात आहे. जिल्ह्यात मागील दोन तीन वर्षांच्या तुलनेत धान पिकांसाठी यंदा अनुकुल वातावरण मिळाल्याने धानाच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. तो धान खरेदीची आकडेवारी पाहता खरा सुध्दा ठरत आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर २ फेब्रुवारीपर्यंत एकूण १२ लाख ५ हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे. ही मागील दहा पंधरा वर्षांतील सर्वाधिक खरेदी असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी २०१५-१६ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामातील खरेदी मिळून १२ लाख १२ हजार क्विंटल धान खरेदीचा रेकार्ड आहे. मात्र यंदा केवळ खरीपातीलच धान खरेदी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १२ लाख ५ हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे. खरीपातील धान खरेदी ही मार्च महिन्यापर्यंत सुरू असते. यात उन्हाळी व रब्बी हंगामातील धान खरेदी जोडल्यास यंदा विक्रमी धान खरेदी होण्याची शक्यता वर्तविली जाते. जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर अजुनही धानाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून खरेदीच्या आकड्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते काहीही असले तरी यंदा मात्र आत्तापर्यंत झालेल्या धान खरेदीने आजवरचे सर्व रेकार्ड मोडले आहे.
पाच क्विंटल धानाची भरडाई
शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची राईस मिलर्स मार्फत भरडाई करुन त्याचा शासकीय स्वस्त धान्य दुकांना पुरवठा केला जातो. आत्तापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १२ क्विंटल धान खरेदी केली असून त्यापैकी ५ लाख क्विंटल धानाची राईस मिलर्सने भरडाईसाठी उचल केली आहे.
३७ हजार शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनातर्फे दरवर्षी प्रती क्विंटल मागे बोनस दिला जातो. मात्र यंदा शासनाने अद्यापही बोनसची घोषणा केलेली नाही. लगतच्या छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यातुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या मिळत असलेला दर फार कमी असून प्रती क्विंटलमागे ८०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकार धानाला ५०० रुपये बोनस जाहीर करुन त्याचा निवडणुकीच्या तोंडावर फायदा करुन घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.