Gondia Rain : गोंदियात रेकॉर्डब्रेक पाऊस; १२ तासांत तब्बल १३२ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 10:40 AM2022-09-22T10:40:05+5:302022-09-22T10:43:37+5:30
अनेक घरांमध्ये शिरले पाणी
गोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे गोंदिया तालुक्यात १३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाल्याचे चित्र बुधवारी (दि.२१) होते.
दमदार पावसामुळे शहरातील रामनगर,मनोहर काॅलनी, परमात्मा एक नगर, रिंगरोड या परिसरातील वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांची तारांबळ उडाली होती. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते, त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. तर पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने शहरातील अनेक शाळा व्यवस्थापनांनी बुधवारी शाळांना सुट्टी दिली होती.
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने १७ कोटींचे नुकसान; पुरात वाहून ७ तर वीज पडून ५ जणांचा मृत्यू
हवामान विभागाने सोमवारपासून जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला होता. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. गोंदिया तालुक्यात १२ तासांत तब्बल १३२ मिमी पावसाची नोंद झाली.
युवक बाईकसह वाहून गेला...
बुधवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास न्यू लक्ष्मीनगर लोहिया वॉर्ड येथील रणजीतसिंग प्रीतमसिंग गिल (२१) हा तरुण पुराच्या पाण्याच्या प्रवाहात बाईकसह वाहून गेला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या शोध पथकाने त्याचा शोध घेण्यासाठी नाल्यात सकाळपासूनच शोध मोहीम सुरू केली आहे.
नगर परिषदेचा गलथान कारभार उघडकीस
शहरातील नाल्यांची मान्सून पूर्व साफसफाई न केल्याने आणि सरकारी तलावातील गाळाचा उपसा न केल्याने याचे पाणी मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांच्या घरात साचले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह सामानाचे नुकसान झाले. रामनगर,मनोहर काॅलनी, परमात्मा एक नगर, रिंगरोड या परिसरातील वस्त्या पूर्णपणे जलमय झाल्याचे चित्र बुधवारी होते. यामुळे नागरिकांनी नगर परिषदेवर संताप व्यक्त केला.
धरणाचे दरवाजे उघडले
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे १३ दरवाजे आणि सिरपूरबांध धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले. धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.