सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:00:21+5:30
जून, जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली होती. जवळपास १ लाख हेक्टरवरील रोवणीची कामे अद्यापही खोळंबली आहेत. पावसाअभावी रोवणी वाळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात शनिवारी (दि.८) सकाळपासूनच काही भागात पावसाचा जोर कायम होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात गेल्या २४ तासात देवरी, गोरेगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. देवरी आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही नाल्यांवर पाणी असल्याने तीन मार्ग बंद आहेत. तर काही घरात सुध्दा पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. या तिन्ही तालुक्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जून, जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली होती. जवळपास १ लाख हेक्टरवरील रोवणीची कामे अद्यापही खोळंबली आहेत. पावसाअभावी रोवणी वाळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात शनिवारी (दि.८) सकाळपासूनच काही भागात पावसाचा जोर कायम होता. रात्रभर पावसाची रिपरिप कायम होती. रविवारी (दि.९) दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धानपिकांना संजीवनी मिळाली आहे. देवरी, गोरेगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील नदी नाले भरुन वाहत होते. आमगाव-देवरी मार्गावरील बोरगाव जवळील नाल्यावर पाणी असल्याने हा मार्ग बंद झाल्याने देवरी-आमगावचा संपर्क तुटला होता. तर सडक अर्जुनी तालुक्यातील मुरदोली-कोसमतोंडी नाल्यावर पाणी असल्याने मुरदोली कोसमतोंडी आणि पांढरीचा संपर्क तुटला होता. गोरेगाव शहरातील वॉर्ड क्रमांक मध्ये रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. सडक अर्जुनी शहरातील काही भागात पाणी साचल्याने समस्या निर्माण झाली होती. दमदार पावसामुळे या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया, सालेकसा तालुक्याला अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
गोरेगाव आणि सडक अर्जुनी शहरातील काही नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी साचल्याने नगर पंचायत अनागोंदी कारभार देखील पुढे आला. त्यामुळे शहरवासीयांनी यासर्व प्रकारावर संताप व्यक्त करुन याकडे लक्ष देण्याची मागणी केली.
या महसूल मंडळात अतिवृष्टी
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात गोरेगाव तालुक्यातील मोहाडी महसूल मंडळात ११२.६० मिमी, देवरी तालुक्यातील देवरी ८५ मिमी, चिचगड महसूल मंडळात ८५ मिमी, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड ७०.६० मिमी, डव्वा ७१.६० मिमी,सडक अर्जुनी ७०.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शेतातील पाणी रस्त्यांवर
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी ते कोहमारा मार्गावर शेतातील पाणी रस्त्यावर आल्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. रविवारी (दि.९) पहाटे पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. नदी, नाले दुथडी भरुन वाहत होते. कोयलारी ते पुतडी मार्गावरील नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग काही वेळासाठी बंद झाला होता. पांढरी ते कोसमतोंडी मार्गावरील नाल्याच्या पुलावर पाणी असल्याने हा मार्ग सुध्दा काही वेळ बंद झाला होता. सडक अर्जुनी जवळून वाहणाऱ्या उमरझरी नाल्या देखील भरुन वाहत होता. कोहमारा येथील काही घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. स्थानिक ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत धोरणाचा फटका या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला.
रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरात
गोरेगाव : गोरेगाव येथे शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी दुसऱ्या दिवशी सुध्दा कायम होता. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पाणी गोरेगाव शहरातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. येथील वार्ड क्र .१३ येथील रहिवासी संजय दिघोरे, युगुल किरसान आणि दिलीप चव्हाण यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले. त्यानंतर येथील नागरिकांनी तीन तास श्रमदान बंधारा तयार करुन पाण्याचा फ्लो कमी केला. जगत महाविद्यालयाकडील पाणी अडवून त्या पाण्याला दुसऱ्या दिशेला वळविण्यात आले.नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी नगर पंचायत सफाई कामगारांना नाल्यांची सफाई करण्याचे आदेश देत पाण्याचा निचरा करण्यास सांगितले.
घरात शिरले पाणी
पांढरी : डुंडा येथील ग्रामपंचायतने नालीतील गाळाचा उपसा न केल्याने व ज्या ठिकाणी नालीचे खोदकाम करणे गरजेचे होते. त्या ठिकाणी कमी प्रमाणात उपसा केल्यामुळे रविवारी आलेल्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्यामुळे त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. या प्रकारावर गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला.