जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या दररोज चार ते पाच रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:11+5:302021-05-11T04:30:11+5:30
गोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता इतर आजारांचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णात वाढ होत असल्याचे चित्र ...
गोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता इतर आजारांचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागील पंधरा दिवसांपासून या आजाराचे दररोज चार ते पाच रुग्ण निघत असून, ही बाब शहरातील ईएनटी आणि नेत्ररोगतज्ज्ञांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच याची माहिती आरोग्य विभागाला दिली. तसेच या आजाराची लक्षणे दिसताच वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत या आजाराचे रुग्ण जिल्ह्यात आढळले नव्हते. गोंदिया येथील ईएनटी आणि नेत्र तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. शहरात बारा नेत्रतज्ज्ञ असून, ते एका दिवसाआड म्युकरमायकोसिस या आजाराचे दोन ते तीन रुग्ण तपासत आहेत. यात ज्यांना कोरोना होऊन गेला आहे. ज्यांना मधुमेह व इतर गंभीर आजार आहेत. त्यांना या आजाराची अधिक लागण होत आहे. कोरोनावर उपचार करताना अधिक काळ आयसीयूमध्ये राहाणे तसेच स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे या आजाराचा धोका वाढला आहे. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, नाकावाटे डोळ्यात आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. यावर वेळीच उपचार न केल्यास डोळा आणि जबडासुध्दा बरेचदा निकामी होत असल्याचे ईएनटी तज्ज्ञ डॉ. संजय भगत यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य विभागानेसुध्दा यासंदर्भात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.