गोंदिया रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नात विक्रमी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:12 PM2017-11-27T23:12:23+5:302017-11-27T23:13:05+5:30
ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आणि दैनदिन प्रवास करणाºया प्रवाशांची वाढती संख्या यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकच्या उत्पन्नात मागील दोन महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे.
देवानंद शहारे ।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आणि दैनदिन प्रवास करणाºया प्रवाशांची वाढती संख्या यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकच्या उत्पन्नात मागील दोन महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे. सन २०१७ मध्ये सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन्ही महिन्यांत गोंदिया रेल्वे स्थानकाला सहा कोटी सहा लाख सहा हजार १९१ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
महाराष्टÑ, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या सीमा गोंदिया जिल्ह्याला लागल्या आहेत. त्यामुळे सदर तिन्ही राज्यातील प्रवाशी गोंदिया स्थानकातूनच प्रवास करतात. त्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक अशी गोंदियाची ओळख आहे. त्यातच नागपूर, रायपूर, चंद्रपूर व जबलपूर अशा चारही दिशांकडे गोंदिया जंक्शनवरून प्रवाशी गाड्या धावतात. त्यामुळे येथे प्रवाशांची अधिक गर्दी असते.
यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सामान्य तिकीट विक्रीतून गोंदिया रेल्वे स्थानकाला दोन कोटी नऊ लाख ४५ हजार ०६५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर याच महिन्यात आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून ८४ लाख ६७ हजार १३० रूपये प्राप्त झाले. सामान्य तिकीट विक्री व आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण दोन कोटी ९४ लाख १२ हजार १९५ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची नोंद गोंदिया रेल्वे स्थानकाने केली आहे. तसेच आॅक्टोबर महिन्यामध्ये सामान्य तिकीट विक्रीतून गोंदिया स्थानकाला दोन कोटी २७ लाख २३ हजार १५९ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून ८४ लाख ७० हजार ८३७ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. सामान्य तिकीट विक्री व आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून गोंदिया स्थानकाला आॅक्टोबर महिन्यात तीन कोटी ११ लाख ९३ हजार ९९६ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
विशेष म्हणजे यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलतेन आॅक्टोबर महिन्याचे उत्पन्न तब्बल १७ लाख ८१ हजार ८०१ रूपयांनी वाढले आहे.
मागील वर्षीच्या प्रवासी संख्येशी तुलना
मागील वर्ष सन २०१६ च्या सप्टेंबरमध्ये सामान्य तिकिटांवर पाच लाख ३४ हजार ९९८ व आरक्षित तिकिटांवर २५ हजार ७६३ अशा एकूण पाच लाख ६० हजार ७६१ प्रवाशांनी गोंदिया रेल्वे स्थानकातून प्रवास केला. तर त्याच्या पुढील महिन्यात आॅक्टोबरमध्ये सामान्य तिकिटांवर पाच लाख १९ हजार ५४६ व आरक्षित बोगींमधून २२ हजार ४४६ अशा एकूण पाच लाख ४१ हजार ९९२ प्रवाशांनी प्रवास केला. सप्टेंबर व आॅक्टोबर २०१६ मध्ये एकूण ११ लाख दोन हजार ७५३ प्रवाशांनी गोंदिया स्थानकातून प्रवास केला.
सन २०१७ च्या सप्टेंबरमध्ये सामान्य तिकिटांवर पाच लाख ३० हजार २५६ तर आरक्षित बोगींमधून २१ हजार २७९ अशा एकूण पाच लाख ५१ हजार ५३५ प्रवाशांनी प्रवास केला. तर आॅक्टोबरमध्ये सामान्य तिकिटांवर पाच लाख ३६ हजार ४८८ व आरक्षित बोगींमधून २४ हजार ९३४ अशा एकूण पाच लाख ६१ हजार ४२२ प्रवाशांनी प्रवास केला. सप्टेंबर व आॅक्टोबर २०१७ मध्ये एकूण ११ लाख १२ हजार ९५७ प्रवाशांनी प्रवास केला.
मागील वर्षाच्या सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांमध्ये तब्बल १० हजार २०४ अधिकच्या प्रवाशांनी गोंदिया रेल्वे स्थानकातून प्रवास केला.