पाच महिन्यांतील उच्चाकी बाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:30 AM2021-04-04T04:30:17+5:302021-04-04T04:30:17+5:30
गोंदिया : मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला होता. त्यानंतर तशीच परिस्थिती पुन्हा जिल्ह्यात निर्माण होत आहे. ...
गोंदिया : मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला होता. त्यानंतर तशीच परिस्थिती पुन्हा जिल्ह्यात निर्माण होत आहे. शनिवारी (दि.३) जिल्ह्यात २५६ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून मागील पाच महिन्यांतील ही रुग्णांची सर्वाधिक उच्चाकी वाढ आहे. त्यामुळे आता तरी जिल्हावासीयांना वेळीच सावध होत स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. मार्च महिन्यात १४६८ कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ७ बाधितांचा मृत्यू झाला. तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोराेनाचा तीन आकडी पाढा सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.
शनिवारी जिल्ह्यात २५६ कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ५० बाधितांनी कोरोनावर मात केली. शनिवारी आढळलेल्या २५६ बाधितांमध्ये सर्वाधिक १६४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ३०, गोरेगाव ५, आमगाव ५, सालेकसा ५, देवरी ९, सडक अर्जुनी ७, अर्जुनी मोरगाव ३० व बाहेरील राज्यातील १ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १०५८५७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९२०४८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत ९१११५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८४०५३ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १६६९२ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १५२४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १२५९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी ८८२ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर ६८३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
....................
गोंदिया तालुका डेंजर झोनमध्ये
गोंदिया तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील तीन- चार दिवसांपासून शंभर रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक ७०६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात आहेत. त्यामुळे हा तालुका डेंजर झोनमध्ये येत आहे. त्यामुळे तालुकावासीयांनी काळजी घेण्याची गरज आहे.
..............
मृत्यूदरात घट
जिल्ह्यात कोरोनाचा आलेख सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२५९ वर पोहोचली आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर १.१ टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९२.१ टक्के आहे.