जिल्ह्यात चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 05:00 AM2022-07-06T05:00:00+5:302022-07-06T05:00:01+5:30
हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात सोमवार पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली असून, मंगळवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८१ मिमी पावसाची नोंद झाली. सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक १५०.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, घरे आणि गोठ्यांची सुद्धा पडझड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात सोमवारपासून पावसाची संततधार कायम असून मंगळवारी (दि.५) सकाळी ११ वाजतापर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम होता. संततधार पावसामुळे तिरोडा, गोरेगाव आणि सडक-अर्जुनी आणि गोंदिया चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १५०.७ मिमी पावसाची नोंद सडक अर्जुनी तालुक्यात झाली आहे. दमदार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून, सडक-अर्जुनी तालुक्यातील खजरी-खोडशिवणी,बाम्हणी ते दल्ली हे मार्ग बंद झाले होते. दोन दिवस झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात सोमवार पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली असून, मंगळवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार कायम होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८१ मिमी पावसाची नोंद झाली. सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक १५०.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, घरे आणि गोठ्यांची सुद्धा पडझड झाली आहे. तिरोडा तालुक्यात १४० मिमी आणि गोरेगाव तालुक्यात १०६ व गोंदिया तालुक्यात ८१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे या भागातील नदी नाले दुथडी भरून वाहत असून, काही मार्ग बंद झाले होते. त्यामुळे तीन चार गावांचा संपर्क तालुक्याशी तुटलेला होता. दोन दिवसांच्या पावसाने पावसाची बरीच तूट भरून निघाली असून, रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तर तलाव व बोड्यांमध्ये सुद्धा पाणी साचले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मजुरीचे दर वाढले
- जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रोवणीच्या कामाला वेग आला आहे. एकाच वेळी रोवणीच्या कामाला सुरुवात झाल्याने मजुरांच्या मागणीत वाढ झाल्याने मजुरीचे दर वाढल्याचे चित्र आहे.
रस्त्यांची झाली पोलखोल
- जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, चार पाच महिन्यापूर्वीच बांधकाम झालेल्या रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.