सात महिन्यात १.१४ कोटीच वसूल
By admin | Published: November 21, 2015 02:11 AM2015-11-21T02:11:09+5:302015-11-21T02:11:09+5:30
मागील वर्षी केलेल्या गोंदिया नगर पालिकेने कर वसुलीत केलेल्या अभूतपूर्व कामगिरीनंतर यावर्षी पुन्हा ढेप खाल्ली आहे.
करवसुली थंडावली: कसे गाठणार ९.६५ कोटी वसुलीचे लक्ष्य?
गोंदिया: मागील वर्षी केलेल्या गोंदिया नगर पालिकेने कर वसुलीत केलेल्या अभूतपूर्व कामगिरीनंतर यावर्षी पुन्हा ढेप खाल्ली आहे. यंदा पालिकेला नऊ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांची करवसुली करण्याचे लक्ष्य आहे. मात्र आतापर्यंतच्या सात महिन्यात त्यातील फक्त १.१४ कोटीच वसुल होऊ शकले. त्यामुळे करवसुलीचे लक्ष्य गाठणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आता कर वसुली विभागात नवीन कर निरीक्षक रूजू झाले असून हे लक्ष्य पूर्ण करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.
कर वसुलीदरम्यान राजकीय अडसर येत असल्याने कर थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढतच चालला आहे. हे जरी उघड सत्य असले तरी पालिकेचे कर्मचारी मात्र काही बोलण्यास तयार नाही. परिणामी पालिकेला आजघडीला जुन्या थकीत करापोटी ५ कोटी ५१ लाख ७११६ रूपये तर चालू वर्षाच्या करापोटी ४ कोटी १४ लाख ३४ हजार ८७६ रूपये असे एकूण ९ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांची करवसुली करावयाची आहे. यात पालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या काळात ७४ लाख चार हजार २१४ रूपये थकीत व ४० लाख १५ हजार ७८७ रूपये चालू अशी एकूण एक कोटी १४ लाख २० हजार रूपयांची वसुली केली आहे. हा करवसुलीचा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमीच आहे. मागील वर्षी पालिकेला सुमारे ११ कोटींच्या कर वसुलीचे टार्गेट होते.
मागील वर्षी कर वसुलीचे हे प्रकरण ‘लोकमत’ने चांगलेच उचलून धरले होते. करवसुली योग्य प्रमाणात झाली नाही तर नगर पालिकेला कारभार चालविणे कसे कठीण होणार हे वेळोवेळी ‘लोकमत’ने निदर्शनास आणून देण्यासोबतच लोकांमध्येही जागृतीचे काम केले होते. त्यानंतर करवसुलीच्या या गंभीर बाबीकडे लक्ष देत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी नगर पालिकेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांचा क्लासच घेतला होता. त्यांचे पगारही थांबविण्यात आले होते. परिणामी पालिकेने सक्रियता दाखवित कर वसुलीलाठी विशेष पथक गठीत करून वसुली अभियान राबविले होते.
विशेष म्हणजे कर वसुली पथकासह खुद्द मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना सुद्धा मैदानात उतरावे लागले होते. याचे फलित असे झाले की, मागील वर्षी पालिकेची ५१.७२ टक्के करवसुली झाली होती. त्यामुळे यंदा कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडून काय पाऊल उचलले जाते यावर यंदाची करवसुली अवलंबून राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)