१,७८३ विक्रेत्यांकडून १३.२९ लाखांची वसुली
By admin | Published: May 6, 2017 12:52 AM2017-05-06T00:52:20+5:302017-05-06T00:52:20+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या विविध रेल्वे स्थानकांत व रेल्वेगाड्यांमध्ये सन २०१६-१७ मध्ये विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या विविध रेल्वे स्थानकांत व रेल्वेगाड्यांमध्ये सन २०१६-१७ मध्ये विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले. यात अनधिकृत खाण्यापिण्याचे साहित्य विकणाऱ्या (व्हेंडर्स) एक हजार ७८३ विक्रेत्यांवर कारवाई करून दंड स्वरूपात १३.२९ लाख रूपये वसूल करण्यात आले.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गाड्या व रेल्वे स्थानकांमध्ये विशेष तपासणी अभियान नियमितपणे राबविण्यात येते. याच श्रृंखलेत सन २०१६-१७ दरम्यान मंडळातील विविध गाड्या तथा रेल्वे स्थानकात विशेष तपासणी अभियानांतर्गत अनाधिकृत एक हजार ७८३ विक्रेत्यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. तसेच दंड म्हणून त्यांच्याकडून १३.२९ लाख रूपयांची वसुली करण्यात आली.
बाहेरील विक्रेत्यांना रेल्वे स्थानक व गाड्यांमध्ये खाण्यापिण्याचे साहित्य विकण्याची अनुमती नाही. असे प्रकरण लक्षात येतात त्याची तक्रार रेल्वे कर्मचारी किंवा हेल्प लाईन किंवा टोल फ्री क्रमांकावर करावी, असे आवाहनही प्रवाशांना केले आहे. यामागे कायदेशीर कारवाई व खाण्याच्या वस्तूंच्या गुणवत्तेप्रती रेल्वे प्रशासन सतर्क रहावे, हा हेतू आहे.