तीन दिवसात २.४८ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:10 AM2017-07-20T00:10:57+5:302017-07-20T00:10:57+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे नागपूर मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ
१०५१ प्रकरणे : विशेष तिकीट तपासणी अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे नागपूर मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाद्वारे १२, १३ व १४ जुलै २०१७ या दिवसी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात मजिस्ट्रेट चेकसुद्धा सम्मिलित आहे. सदर तीन दिवसांत एक हजार ५१ प्रकरणे पकडून त्यांच्याकडून दोन लाख ४८ हजार ७६५ रूपयांचे दंड वसूल करण्यात आले.
यात १२ व १३ जुलै रोजी राजनांदगाव स्थानकात किलाबंदी चेकिंग, नागपूर-गोंदिया मार्गावर विशेष कॅम्प कोर्ट चेक व इतवारी-नागभिड मार्गावर एम्बुश चेक करण्यात आले. त्या अंतर्गत विनातिकीट, अनियमित तिकीट व बुक न करताच लगेजचे एक हजार ०५१ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन लाख ४८ ७६५ रूपये दंडस्वरूपात वसूल करण्यात आले.
याशिवाय १३ जुलै रोजी गोंदियात मजिस्ट्रेट श्रीनाथ एन. फड यांच्याद्वारे रेल्वे अधिनियमांतर्गत अनियमित तिकीट, महिला कोचमध्ये आढळलेले व अनधिकृतपणे रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या ११४ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडस्वरूपात २९ हजार ३०० रूपयांची वसुली करण्यात आली.
१४ जुलै रोजी इतवारी स्थानकात कॅम्प कोर्टदरम्यान मजिस्ट्रेट यांच्या उपस्थितीत व सहायक वाणिज्य व्यवस्थापक ओमप्रकाश जायस्वाल यांच्या नेतृत्वात विनातिकीट, अनियमित तिकीट व बुक न केलेल्या लगेजचे ५१५ प्रकरणे पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात ९७ हजार ९२० रूपयांची वसुली करण्यात आली. घाण पसरविणारे व धुम्रपान प्रकरणे नोंदविण्यात आले.
का झाली नागपूरची निवड?
प्रवाशांद्वारे रेल्वे नियमांचे पालन न करणारे तथा योग्य प्रवास तिकीट घेवून निर्धारित गाड्यांच्या नामित बोगींमध्ये प्रवास न केल्यावर त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. सीझन तिकीटधारक प्रवाशांना इंटरसिटी एक्सप्रेस (१२८५५/१२८५६) गाडीच्या बोगी क्रमांक एस-६ व एस-७ (अनारक्षित स्लीपर श्रेणी) मध्ये नागपूर ते बिलासपूर व बिलासपूर ते नागपूर तसेच गोंदिया-कोल्हापूर (११०४०) महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये एस-२ ते एस ७ या अनारक्षित स्लीपर श्रेणीच्या बोगींमध्ये केवळ गोंदिया ते नागपूरपर्यंत प्रवासाची अनुमती देण्यात आली. कोल्हापूर-गोंदिया (११०३९) महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये नागपूर ते गोंदिया दरम्यान आरक्षित श्रेणीच्या कोणत्याही बोगीत सीझन तिकीट धारकांना प्रवासासाठी अनारक्षित कोच ठरविले नाही. त्यामुळे सीझन तिकीट धारक प्रवाशांनी प्रवासादरम्यान रेल्वे नियमांचे पालन करून रेल्वे प्रशासनाला सहयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.