रेल्वेने केला लाखो रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 08:49 PM2018-07-14T20:49:23+5:302018-07-14T20:50:53+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी विशेष अभियान जून २०१८ मध्ये राबविण्यात आले. महिनाभराच्या कालावधीत अनेक गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून लाखो रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी विशेष अभियान जून २०१८ मध्ये राबविण्यात आले. महिनाभराच्या कालावधीत अनेक गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून लाखो रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ई-तिकीट व अनाधिकृत तिकीट दलालांविरूद्ध विशेष अभियान राबवून कारवाई करण्यात आली. यात एकूण १२ प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यापैकी नऊ अनाधिकृत ई तिकिटांचे व दोन रेल्वे पीआरएसची प्रकरणे आहेत. सर्व गुन्हेगारांकडून ११ लाख ४४ हजार ११४ रूपये किमतीच्या अनाधिकृत तिकीट, कंप्युटर, प्रिंटर, मोबाईल, दस्तावेज जप्त करण्यात आले. तसेच १३ आरोपींना अटक करण्यात आली.
रेल्वे सुरक्षा दल गोंदियाद्वारे राबविण्यात आलेल्या अभियानात मानव तस्करी करण्याचे एक प्रकरण नोंद आहे. यात १० महिला व बालकांना तस्करीपासून वाचवून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
रेल्वेच्या माध्यमाने अनधिकृतपणे गांजा, दारू, मादक पदार्थ आदी वस्तू वाहून नेण्यावर अंकुश लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने राबविलेल्या विशेष अभियानात एकूण तीन गांजा तस्करी करण्याची प्रकरणे पकडण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाख १९ हजार ८३० रूपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. तिन्ही आरोपींना योग्य कारवाईसाठी जीआरपीच्या सुपूर्द करण्यात आले. तर दारू वाहून नेणाऱ्या दोन प्रकरणांत तीन आरोपींना पकडण्यात आले.
त्यांच्याकडून २० हजार ८० रूपयांची दारू व इतर साहित्य जप्त करून आरोपींना जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वे संपत्तीच्या चोरीवर आळा घालण्यासाठी राबविलेल्या अभियानात रेल्वे संपत्ती (अवैध कब्जा) अधिनियमान्वये एकूण १८ प्रकरणे दाखल करण्यात आली. यात एकूण ३२ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६३ हजार ८७८ रूपयांची रिकव्हर करण्यात आली. आरोपींवर न्यायालयीन कारवाई केली जात आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलाद्वारे प्रवाशांच्या सामानांच्या चोरीच्या २७ प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यात आला. ५८ गुन्हेगारांना अटक करून एक लाख ६५ हजार ४५९ रूपये किमतीच्या प्रवाशांचे सामान चोरांकडून जप्त करण्यात आले.
आरोपींना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाद्वारे जून महिन्यात विविध कलमान्वये एकूण ५ हजार १७७ प्रकरणांत एकूण ५१०५ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर न्यायालयीन कार्यवाही करून रेल्वे न्यायालयाद्वारे १५ लाख ६५ हजार ४१५ रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.