प्राध्यापकांची भरती तत्काळ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:27+5:302021-06-16T04:38:27+5:30
गोंदिया : राज्यात रखडलेली प्राध्यापकांची भरती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंशकालीन संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.१५) जिल्ह्याच्या दौऱ्यावर ...
गोंदिया : राज्यात रखडलेली प्राध्यापकांची भरती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंशकालीन संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.१५) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना भेटून करण्यात आली. यासाठी संघटनेच्या वतीने ना.सामंत यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद असल्याने, शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. सोबतच नेट-सेट व पीएच.डी प्राप्त करून, प्राध्यापक होण्याचे स्वप्न बघितलेल्या युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. प्राध्यापक भरती बंद असल्याने, नेट-सेट व पीएच.डी प्राप्त युवकांची फौज राज्यात निर्माण झाली असून, राज्य शासनाच्या विरोधात तीव्र रोष दिसून येत आहे. शासनाने प्राध्यापक भरती न करता, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या भरवशावर वरिष्ठ महाविद्यालयीन अध्यापन चालविले जात आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना केवळ ३ महिन्यांची नियुक्ती दिली असून, त्यांना तेवढेच वेतन मिळणार असल्याने, १२ महिने कशी गुजराण करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकरिता प्राध्यापकांची भरती तत्काळ करावी, अशी मागणी संघटनेने केली असून, ना.सामंत यांना निवेदन दिले. निवेदन देऊन चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात डाॅ.संतोष चोपकर, आशिष शहारे, नितेश मेश्राम, संतोष शिवणकर, रवींद्र तिडके, ललित कटरे, महेंद्र बघेले, अमोल बडोले, रितू तुरकर, पपेंद्र पटले, भूषण बघेले आदी उपस्थित होते.
----------------------------------
या आहेत संघटनेच्या मागण्या
राज्यशासन अनुदानित सर्व महाविद्यालय, संस्था व विद्यापीठातील १०० टक्के प्राध्यापक भरती तत्काळ करण्यात यावी व त्यांच्या स्थापनेनुसार १०० बिंदु नामावली (विभागवार रोस्टर) जागांचा अनुशेष तत्काळ भरण्यात यावा, समान वेतन समान काम (सीएचबी संदर्भात) देण्यात यावे, १४ नोव्हेंबर, २०१८चा वरिष्ठ महाविद्यालय संदर्भातील शासन निर्णय रद्द करावा, सीएचबीधारकांची ११ महिन्यांकरिता नियुक्ती करून, मासिक वेतन देण्यात यावे, शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती ऑगस्ट, २०२० ते मे, २०२१ पर्यंत कालावधीसाठी करून, या कालावधीचे सीएचबीधारकांना मानधन अदा करण्यात यावे आदी संघटनेच्या मागण्या आहेत.