नुकसान कमी, दिलासा जास्त
By admin | Published: September 13, 2016 12:29 AM2016-09-13T00:29:49+5:302016-09-13T00:29:49+5:30
तब्बल तीन आठवड्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने शनिवारी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. शनिवार,
सलग तिसऱ्या दिवशी पाऊस : पुन्हा चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद
गोंदिया : तब्बल तीन आठवड्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने शनिवारी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. शनिवार, रविवार आणि सोमवारीही पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या धानपिकांना यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र सालेकसा, देवरी तालुक्यात पावसाने कहर केल्यामुळे काही प्रमाणात नुकसानही झाले.
या पावसामुळे पिकांना कोणतेही नुकसान झाले नसून भारी जातीच्या धानपिकास लाभच झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. जिल्ह्यात रोवणीची कामे आटोपल्यानंतर आता निंदणाची कामे सुरु आहेत. पिकातील केरकचरा, गवत आदी काढून धानपीक मोकळे करण्याची कामे जोमात सुरू आहेत. परंतु सध्या धानपीक गर्भावस्थेत असून फुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भारी जातीच्या धानपिकाला पाण्याची तर गरज होतीच, पण हलक्या जातीच्या धानाला एका पावसाची गरज होती. ही गरज सध्याच्या आलेल्या पावसाने पूर्ण केल्याने शेतकरी सुखावले आहेत. विशेष म्हणजे या पावसाने धानावरील कीड नष्ट झाल्याचे दिसून येते.
तीन दिवसांत देवरी व सालेकसा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यासोबतच आमगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात रविवारी ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अतिवृष्टीचा फटका काही भागातील रहदारीला झाला. नाल्यांना पूर आल्याने आणि पुलावरून पाणी वाहात असल्याने काही मार्ग बंद पडले. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १,०५८.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)
पिकांना फायदाच होणार
सध्याच्या पावसाबाबत कृषी विभागाकडे संपर्क साधला असता, धानपीक गर्भावस्थेत असून फुटण्याच्या मार्गावर आहे. आलेला पाऊस पिकांच्या वाढीसाठी पोषक आहे. ज्या ठिकाणी जास्त पाऊस आला, तेथील शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये. ते पाणी जमिनीत मुरले असून पिकांसाठी लाभदायकच ठरले. जिल्ह्यात धानपीक असल्यामुळे या पाण्याचा लाभच होईल. जिल्ह्यात सोयाबिन पीक असते तर सोयाबिनला काही प्रमाणात नुकसान झाले असते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए.एस. भोंगाडे यांनी सांगितले.
पाच तालुक्यांत नुकसान
रविवारी (दि.११) आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी घरांची पडझड होवून लाखोंचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. काही ठिकाणी पंचनामे होवून नुकसानाची अंदाजे रक्कम काढण्यात आली आहे, तर काही ठिकाणचे पंचनामे होणे बाकी असल्याने नुकसानाची अंदाजे रक्कम मिळू शकली नाही.
गोरेगाव तालुक्यात १६ घरे अंशत: बाधित झाली असून एक लाखाचे नुकसान झाले आहे. सोनी येथील एका शेळीचा मृत्यू झाला. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३० घरे अंशत: बाधित झाले असून ९० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
देवरी तालुक्यातील २५ घरे व सहा गोठे बाधित झाले आहेत. आमगाव तालुक्यात १११ घरे व ३२ गोठे अंशत: बाधित झाले. तसेच एका शेळीचा मृत्यू झाला. यात अंदाजे आठ लाख ३२ हजार १०० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.
सालेकसा तालुक्यात १०१ घरे व ४९ गोठे अंशत: बाधित तर तीन घरे पूर्णत: कोसळल्याचे वृत्त आहे. गोंदिया व सडक-अर्जुनी तालुक्यात तूर्त नुकसान नाही.
सिरपूर जलाशयाचे पाच दरवाजे उघडले
सिरपूरबांध : दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सिरपूर जलाशयातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. सोमवारी जलाशयाचे ५ दरवाजे चार-चार फुटांनी उघडून त्यातून १६३२० क्युसेक पाणी सोडण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने बाघनदी काठाजवळील गावांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नदी काठावरील लोकांनी सावध राहावे म्हणून पाटबंधारे विभागाने संबंधित विभागाला माहिती दिल्याचे शाखा अभियंता यांनी सांगितले. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पर्यटकांनीही सोमवारी येथे हजेरी लावल्याचे दिसून आले.
तालुकानिहाय पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये)
तालुका २४ तासात आतापर्यंत
गोंदिया ४०.० ९२८.०
तिरोडा ३.४ १०५७.४
गोरेगाव ६०.० १०४४.५
आमगाव १५८.० १०५७.०
सालेकसा १९५.४ १३६८.४
देवरी १०५.० १०१६.०
सडक अर्जुनी ६५.४ १०९८.२
अर्जुनी मोरगाव ५७.० ९०१.९
एकूण सरासरी ८५.५ १०५८.९